गडचिरोली : इंडी आघाडीच्या गाडीमध्ये सगळे इंजिन आहेत. एकही बोगी नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. शनिवारी गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. या निवडणूकीत केवळ दोन खेमे तयार झाले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए आणि महायूती आहे. तर दुसरीकडे, राहूल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची इंडी आघाडी आणि महाविकास आघाडी आहे. आपली गाडी विकासाची आहे. या गाडीचं इंजिन हे मोदी साहेब आहेत. तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार, रिपाई आणि एनडीएतील वेगवेगळे पक्ष या गाडीमध्ये बोगीच्या रुपात लागलेले आहेत. या बोग्यांमध्ये दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, महिला, शेतमजूर, ओबीसी या प्रत्येकाला बसण्याची जागा आहे. मोदीजींचं पॉवरफुल इंजिन सगळ्यांना घेऊन विकासाकडे आपली गाडी चालते."
हे वाचलंत का? - "मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून...;" राज ठाकरेंचा टोला
"राहूल गांधींच्या गाडीला फक्त इंजिन आहे. त्याला डब्बे नाहीच. कारण राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद हे प्रत्येकजण म्हणतो मी इंजिन आहे. पण इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हरला बसण्याची जागा असते. यांचं एक इंजिन पूर्वेला तर दुसरं पश्चिमेला जाते. एक इंजिन उत्तरेला ओढते तर दुसरं दक्षिणेला ओढते. यांची गाडी पुढे जातच नाही. राहूल गांधींची पुढे न जाणारी गाडी तयार झालेली आहे. मोदीजींच्या गाडीमध्ये प्रत्येकाला जागा असून प्रत्येकाचा विकास होणार आहे," असेही ते म्हणाले.