'त्या' सफाई कर्मचाऱ्यांच्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी

विवेक विचार मंचची महत्त्वाची मागणी

    12-Apr-2024
Total Views |

Vivek Vichar Manch

मुंबई (प्रतिनिधी) :
विरार पश्चिम येथे ग्लोबल सिटी नावाने मोठा गृह प्रकल्प आहे. याठिकाणी मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी ड्रेनेज सफाई काम करताना चार सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवेक विचार मंचाच्या (Vivek Vichar Manch) शिष्टमंडळाने पिडीत कुटुंबांच्या घरी जाऊन भेट घेतली असून संबंधित पोलीस स्थानकात दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

ग्लोबल सिटी प्रकल्पांच्या खासगी 'सीवेज ट्रीटमेंट प्लांट' मध्ये प्रथमतः एक कर्मचारी चोकअप काढण्यासाठी अंदाजे २५-३० फूट खोल असणाऱ्या टाकीमध्ये उतरला. परंतु तो लवकर बाहेर न आल्याने त्याचा सख्खा भाऊ टाकीमध्ये उतरला. ते दोघेही टाकीमधून बाहेर आले नाहीत म्हणून इतर २ जण त्या टाकीमध्ये उतरले. ही सर्व घटना घडत असताना सदर कंपनीचा सुपरवायझर मधुकर हा देखील उपस्थित होता. ही घटना झाल्यानंतर पोलिसांना व इतर यंत्रणांना घटनास्थळी बोलवण्यात आले व त्यांनी चारही बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांना टाकीतून बाहेर काढले. त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता अमोल घाटाळ (२८), निखिल घाटाळ (२४), शुभम पारकर (२८), सागर तांदळेकर (३१) या चारही कर्मचाऱ्यांना मृत घोषित करण्यात आले.

सीवेज ट्रीटमेंट प्लांट टाकी

सदर घटनेच्या अनुषंगाने अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्रमांक १५८/२०२४ भादविस कलम ३०४, ३४ सह हाताने मैला उचलण्या-या सफाई कर्मचाऱ्याच्या सेवायोजनेस कर्मचाऱ्याच्या प्रतिबंध आणि त्याचे पुर्वसन अधिनियम २०१३ चे कलम ८, ९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी अटकेत आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी विनंती विवेक विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी अर्नाळा पोलीस स्टेशन येथे केली आहे.

हे वाचलंत का? : समाजात भक्ती आणि समर्पणाची भावना जागवणे हेच संघाचे कार्य

यावेळी विवेक विचार मंचचे कोकण प्रांत सह-संयोजक जयवंत तांबे, कपिल जाधव, साक्षात सातपुते, किशोर परब, ॲड.रिषभ परदेशी व सामाजिक कार्यकर्ते कुंदन खंडागळे हे उपस्थित होते. या प्रकरणी पिडीत कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणे व दोषींवर कारवाई व्हावी तसेच अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी विवेक विचार मंच पुढील पाठपुरावा करत आहे.


Vivek Vichar Manch

सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी
सदर घटनास्थळावर कोणताही सुरक्षारक्षक उपलब्ध नव्हता. ज्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही वस्तू आढळून आल्या नाहीत. ज्या ठिकाणाहून सफाई कर्मचारी त्या टाकीमध्ये उतरले त्या ठिकाणी सुरक्षा जाळीची देखील व्यवस्था नव्हती. यावरून आपणास घटनेची भीषणता लक्षात येईल. अशा प्रकारचे काम हे यंत्राद्वारे केले गेले पाहिजे. काम करणाऱ्या कामगारांना योग्य साधनसामुग्री कंत्राटदाराने किंवा प्रशासनाने पुरविली पाहिजे. तसेच त्यांना सदर काम करीत असताना योग्य प्रशिक्षण दिले गेले पाहिजे व आवश्यक खबरदारी घेतली गेली पाहिजे. घाटाळ कुटुंब व पारकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या न्याय हक्कांसाठी विवेक विचार मंच नेहमी त्यांच्या बाजूने असेल.
- विवेक विचार मंच, महाराष्ट्र