बाबासाहेबांच्या वाटेवर चालताना...

11 Apr 2024 22:52:24

sfd 
तथागत गौतम बुद्धांची मंगल मैत्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रनिष्ठा हा विचारच समाजाला दिशा देईल, यानुसार कार्य करणारे नितीन मोरे. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
80 चे साल होते. त्यावेळी आशाबाई मोरे शेजारच्या भाजीच्या मळ्यात मजूर म्हणून काम करायच्या. तिचे पती मधुकर गिरणीमध्ये कंत्राटी कामगार. आज मधुकर यांना पगार मिळणार, आपण पोटभर जेवणार या विचारांनी मोरे दाम्पत्याचा सात-आठ वर्षांचा लेक नितीन उत्साहात होता. पण, मधुकर घरी आले, ते डोळ्यात पाणी घेऊन. कारण, पगार मिळालाच नव्हता. मधुकर म्हणाले की, ”महिनाभर काम करूनही कंत्राटदार अर्धा पगार देत होता. पूर्ण पगार मागितला म्हणून कंत्राटदाराने मला मारहाण केली आणि सांगितले जा कुठे जायचे ते जा, आता तर पगारच देणार नाही. कुणाकडे दाद मागायची? सगळे नातेवाईक आणि मित्रही आपल्यासारखेच गरीब आणि असाहाय्य.” हे सगळे नितीन ऐकत होते. बाबांनी कष्ट केले होते, तरीसुद्धा त्यांच्यावर अन्याय झाला होता. या अन्यायाविरोधात जाब विचारू नये, अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती बदलायला हवी. आपण बुद्धविहारात बाबासाहेबांच्या गोष्टी ऐकल्या. त्यामध्ये तर बाबासाहेब अन्यायाविरोधात आवाज उठवा सांगतात. मग हे असे का? आपण मोठे झालो की, समाजबांधवांना न्याय मिळूवन द्यायचा, हे नितीन यांनी ठरवले.
 
आज हेच नितीन ’भीम आर्मी’चे संस्थापक-अध्यक्ष आहेत. बौद्ध धम्माचा, विहारांचा त्यांचा विशेष अभ्यास. ’महाबोधी महावीर मुक्ती संग्राम संस्थे’चे ते निमंत्रक आहेत. तसेच ’मुंबई भिक्खू संघा’चे ते प्रवक्ते आहेत. सिद्धार्थ नगर बुद्धविहारचे ते सक्रिय सदस्य असून, ‘भारतीय बौद्ध महासंघ,’ मिलिंद नगर शाखा बुद्धविहाराचे माजी अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. समाजातील तरुणांना उद्योग मिळावा, नोकरी मिळावी, यासाठी त्यांनी ’भीम उद्योग’ नावाची संस्थाही काढली. या संस्थेद्वारे आजतागायत १००हून अधिक गरजूंना नोकरी-व्यवसाय मिळवून दिले. महिलांच्या समग्र विकासासाठी त्यांनी विदर्भामध्ये ’महिला मुक्ती मोर्चा’ संघटना स्थापन केली. नितीन यांना वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तथागत गौतम बुद्धांच्या मंगल मैत्रीनुसार मागासवर्गीय समाजाचे प्रश्न समजून घेतात आणि त्यावर काम करतात.
 
मधुकर मोरे आणि आशा मोरे हे कुटुंब मूळचे बुलढाण्याचे. त्यांना तीन अपत्य. त्यापैकी एक नितीन. १९७२ साली हे कुटुंब जगण्यासाठी मुंबईत आले. मधुकर यांनी नितीन यांना इंग्रजी खासगी शाळेत टाकले. नितीन यांच्यातली समाजशीलता उदय पावणारी एक घटना अशी की, वस्तीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये. एकदा एका महिलेला तीन-चार पुरूष मिळून मारत होते. या महिलेने शौचालयामध्ये मासिक पाळीमध्ये वापरलेला कपडा टाकला आणि त्यामुळे शौचालय तुंबले. तुंबलेले शौचालय स्वच्छ करण्यासाठी, तिने पैसे द्यावे, असे त्यांचे म्हणणे. ११-१२ वर्षांचे नितीन आणि त्यांचे समवयस्क मित्र हे सगळे पाहत होते. तुंबलेले शौचालय स्वच्छ झाले नाही, तर आपल्या आया-बहिणींना अशा शौचालयात जावे लागेल, या विचारांनी नितीन यांनी त्यांच्या मित्रांना आवाहन केले की, आपण शौचालय आठवड्यातून एकदा स्वच्छ करत जाऊ. नितीन आणि त्यांचे मित्र शौचालय स्वच्छ करू लागले. वस्ती मूळ रस्त्यापासून दूर होती. कचरा उचलणारी गाडी वस्तीत येतच नसे. त्यामुळे वस्तीमध्ये भलामोठा कचर्‍याचा डोंगर तयार झाला. नितीन आणि त्यांच्या मित्रांनी तो डोंगर उपसून, मुख्य रस्त्यावर येणार्‍या कचर्‍याच्या गाडीत टाकला. नितीन यांचे नेतृत्व अशाप्रकारे तयार होत होते. परिसरातील अठरापगड मागास जातींच्या मुलांशी त्यांची मैत्री होती. त्यामुळेच मागासवर्गीय समाज म्हणून ५९ जातींसाठी काम करायचे, हे नितीन यांचे ध्येय ठरले.
 
पुढे नितीन यांनी बारावीची परीक्षा दिली. पुढे ’नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर मेन्टली हॅण्डिकॅप’ संस्थेमध्ये दोन वर्षांचा कोर्स केला आणि ते मानसिकरित्या सक्षम नसलेल्या व्यक्तीच्या समुपदेशनाचे काम करू लागले. त्याद्वारे अर्थार्जनही होऊ लागले आणि खर्‍या अर्थाने वंचित, शोषित असलेल्या व्यक्तींच्या समस्याही सेाडवता येऊ लागल्या. बाबासाहेब म्हणाले होते की, ’शासनकर्ती जमात व्हा!’ ती शासनकर्ती जमात होण्यासाठी, याच काळात ते विविध राजकीय पक्षांच्या संपर्कातही आले. अगदी ‘दलित मुक्ती सेना’ ते ‘रिपब्लिकन पक्ष’ ते २०१० सालच्या तत्कालीन शिवसेनेच्याही. मात्र, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले सामजिक अभिसरण आणि न्याय त्यांना कुठेच दिसला नाही. या सगळ्यातून त्यांचा भ्रमनिरास झाला, तरीही सामाजिक कार्य त्यांनी अबाधित ठेवले. या कामी त्यांची आई तसेच पत्नी कल्पना यांची त्यांना मोलाची साथ लाभली. ते म्हणतात की, ”माझे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना किती विषमता सहन करावी लागली; मात्र त्यांनी कधीही द्वेष बाळगला नाही. संधी मिळाली, तेव्हा सकारात्मकतेचा इतिहास घडवला. संविधानाद्वारे देशातील सर्वच जाती-धर्मांच्या नागारिकांना हक्क आणि अधिकार दिले. कारण, ‘राष्ट्र सर्वतोपरी’ हाच त्यांच्या कार्याचा हेतू होता. बाबासाहेब माझे सर्वस्व आहेत. त्यामुळे आयुष्यातल्या कोणत्याही नकारात्मक बाबी बाजूला ठेवून, मी ‘राष्ट्र सर्वतोपरी’ हेच ध्येय बाळगतो. त्यानुसार काम करतो. यापुढेही मी राष्ट्राच्या ऐक्यासाठी, कल्याणासाठी अभिप्रेत असणारेच कार्य करत राहणार.” नितीन मोरे यांच्यासारख्या व्यक्ती खर्‍या अर्थाने डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवत असतात, हेच खरे!
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0