व्यक्ती विकासातून राष्ट्रनिर्मिती हे संघाचे कार्य : अरुण कुमार
10 Apr 2024 14:22:07
(Arun Kumar Varsha Pratipada Himachal)
मुंबई (प्रतिनिधी) : "संघाचे कार्य व्यक्ती विकासापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंतचे आहे. त्यासाठी संस्कार हे माध्यम म्हणून वापरले जाते आणि संस्कार मजबूत ठेवण्यासाठी त्याचे पुन:पुन्हा आचरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून इतर सामाजिक दुष्कृत्यांमुळे चांगले संस्कार कमकुवत होणार नाहीत आणि व्यक्तीचे चारित्र्य व सामाजिक अध:पतन होणार नाही.". असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमार यांनी केले.
बिलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे हिंदु नववर्षानिमित्त आयोजित वर्ष प्रतिपदा उत्सवाला अरुण कुमार यांनी नुकतेच संबोधित केले. यावेळी हिमाचल प्रदेशचे प्रांतीय संघचालक वीर सिंह रंगरा जी, शहर संघचालक सुरेंद्र जी यांच्यासह इतर अधिकारी, कार्यकर्ता आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
अरुण कुमार यावेळी म्हणाले की, "भारतीय नववर्ष परंपरा व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जगाच्या निर्मिती, संघटन आणि समरसतेचे प्रतीक आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून लाखो वर्षांच्या मानवी संस्कृतीचा इतिहास चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतो. भारतीय संस्कृतीत विविध स्वरूपात तो इतिहास साजरा करण्याची परंपरा आहे. सार्वजनिक जीवनात प्रचलित असलेल्या व्यवस्था आणि परंपरा मानवी जीवनाच्या विकासासाठी अनुकूलता प्रदान करतात, जेणेकरून एक सुसंस्कृत, संघटित समाज आणि राष्ट्र निर्माण होऊ शकते आणि जागतिक बंधुत्वाची भावना देखील दृढ होऊ शकते. भारताची नवीन वर्ष परंपरा विज्ञान, वर्तन आणि सूर्यमालेच्या हालचालींवर आधारित आहे; जी धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि लोक वर्तनाद्वारे व्यक्तीपासून राष्ट्राची निर्मिती करते."
वर्ष प्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिन आणि विजयादशमी या तीन विषयांवर आपले मत व्यक्त करत ते म्हणाले, "वर्ष प्रतिपदा हे समाजासाठी अभिमानाचे प्रतिक आहे. वर्ष प्रतिपदेचा दिवस हा आपल्या शूर महापुरुषांचे स्मरण करण्याची एक संधी आहे. हिंदू साम्राज्य दिन हे उत्सव, धर्माचा विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा दिवस समृद्धी, आदर आणि एकतेचा दिवस म्हणून साजरा केल्याने आपण हिंदू साम्राज्याच्या गौरवशाली भारतीय इतिहासाशी जोडले जातो. भारताच्या विविध प्रदेशांमध्ये, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या आपण आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा अभिमान ओळखण्याचा प्रयत्न करतो.
तसेच विजयादशमीचा उत्सव आपल्या जीवनातील शौर्य आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. विजयादशमी उत्सव, संघाचा स्थापना दिवस म्हणून, हिंदू लोकांमध्ये सामाजिक सलोखा, सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय भावना मजबूत करण्याचा मार्ग प्रशस्त करतो. त्यामुळे भारताच्या परंपरा, संस्कार आणि हिंदू साम्राज्याच्या अखंडतेप्रती समर्पणाची भावना व्यक्त करणाऱ्या या सणाला हिंदू लोकांच्या मनात विशेष महत्त्व आहे."