नवी दिल्ली : समाजवादी पक्षाने (सपा) लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा बुधवारी प्रकाशित केला. यामध्ये अग्नीवीर योजना रद्द करण्यासह अन्य आश्वासनांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी लखनौमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
अखिलेश यादव यांनी व्हिजन डॉक्युमेंट 2024 या नावाने जारी केलेल्या जाहीरनाम्याला 'जनतेचे मागणी पत्र, आमचे हक्क' असे नाव दिले आहे. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, सपा व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आलेल्या सर्व सूचनांचा समावेश कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जाहिरनाम्यासाठी समाजमाध्यमांवरूनही सुचना मागविण्यात आल्या होत्या. या सर्वांचे संकलन करून जाहिरनामा जारी करण्यात आला आहे.
हे वाचलंत का? - यंदा 'सपा'चा बालेकिल्ला ढासळणार?
जाहिरनाम्यामध्ये संविधानाच्या रक्षणाचा अधिकार, लोकशाही रक्षणाचा अधिकार, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा अधिकार आणि सामाजिक न्यायाचा अधिकार याची हमी देण्यात आली आहे. देशाचा विकास जात जनगणनेशिवाय शक्य नाही, त्यामुळे सत्ता आल्यास जातजनगणना करण्याचेही आश्वासन दिल्याते अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
अशी आहेत आश्वासने
· जुनी पेन्शन योजना लागू करणार.
· 2025 पर्यंत जात आधारित जनगणना करणार.
· अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गाच्या सर्व सरकारी रिक्त जागा 2025 पर्यंत भरल्या जातील.
· खाजगी क्षेत्रात समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणार.
· 2029 पर्यंत भुकेपासून मुक्तता, गरिबीचे निर्मुलन.
· एमएसपीची कायदेशीर हमी.
· भूमिहीन शेतकऱ्यांसह सर्व कृषी कर्ज माफ करणार.
· शेतकऱ्यांना मोफत सिंचन केले जाईल
· भूमिहीन शेतकऱ्यांसह सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा रुपये 5000 पेन्शन.
· राज्यांमध्ये दर 10 किलोमीटर अंतरावर कृषी उत्पन्न बाजाराची स्थापना करणार.
· मनरेगाच्या धर्तीवर श्री रोजगार हमी कायदा.
· तरुणांसाठी देशभरात लॅपटॉप वितरण.
· शिधापत्रिकाधारकांना ५०० रुपयांचा मोफत डेटा.
· पोलिसांसह सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण.
· दारिद्र्यरेषेखालील महिलांना दरमहा ३००० रुपये निवृत्तीवेतन