अंध व्यक्तींचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा 'श्रीकांत' चित्रपट लवकरच येणार भेटीला
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : विनोदी, गंभीर किंवा नकारात्मक कोणत्याही पठडीतील भूमिकांना न्याय देणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची दखल हिंदी मनोरंजनसृष्टीलाही घेण्यास भाग पाडणारे भरत जाधव (Bharat Jadhav) तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ चित्रपटात एक महत्वपुर्ण भूमिका करताना दिसणार आहेत. याबद्दल 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांनी चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचे विशेष कौतुक केले.
भरत जाधव म्हणाले की, “ ‘श्रीकांत’ चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांच्या ‘स्कॅम २’ मध्ये मी काम केले होते. त्यामुळे एकेदिवशी तुषार यांनी मला फोन करुन श्रीकांत चित्रपटाबद्दल सांगितले आणि यात एक छोटेखानी भूमिका असून ती तू साकारावी असे त्यांनी म्हटले. चित्रपटाचा विषयच मुळात इतका सुंदर असल्यामुळे मी होकार दिला आणि खरं सांगायचं तर मैत्रीसाठी मी ‘श्रीकांत’ चित्रपटासाठी तुषार यांना होकार दिला”.
राजकुमार राव हा कर्मशिअल स्टार नसून रंगभूमीशी आणि आपल्या कलेशी एकरुप असलेला कलाकार आहे असे म्हणत भरत जाधव यांनी राजकुमार यांचे कौतुक केले. भरत जाधव म्हणाले, "ज्यावेळी राजकुमार सेटवर यायचे तेव्हा ते आल्यापासून ते शुटचे पॅकअप होईपर्यंत श्रीकांत म्हणूनच सेटवर वावरत होते. दिग्दर्शकांनी जरी कट म्हटलं ती उगाच कुणाशी जाऊन गप्पा न मारता ते पु्र्णवेळ त्यांच्या भूमिकेत होते आणि ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखेशी ते प्रामाणिक होते ही बाब खरंच कौतुकास्पद आहे”.
‘श्रीकांत’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता राजकुमार राव असून त्यांना शरद केळकर, ज्योतिका यांनी देखील साथ दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून टी-सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी यांनी निर्मिती केली आहे. श्रीकांत चित्रपट १० मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.