मुंबईच्या ताडदेव भागात 'डिलिव्हरी बॉय'मुळे असुरक्षित वातावरण!

01 Apr 2024 19:35:59
Tardeo Mumbai City Delivery Boy



मुंबई :   
  मुंबईच्या ताडदेव भागात दिवस-रात्र कर्णकर्कश आवाज, बेफान वेगाने चालणाऱ्या दुचाकींची वर्दळ आणि दररोज दीड ते दोन हजार अनोळखी व्यक्तींचा मुक्त संचार... अशा असुरक्षित वातावरणाला कंटाळलेले नागरिक रविवार, दि. ३१ मार्च रोजी रस्त्यावर उतरले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांच्या बाजूने उभे राहत, आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांच्याकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

ताडदेव परिसरातील तुळशीवाडी रोडलगत रोझोस नावाचे हॉटेल आहे. त्यांनी आपली काही जागा 'इन्स्टामार्ट' या कंपनीला भाडेतत्त्वार दिली आहे. ग्राहकांच्या ऑनलाइन मागणीनुसार ते किराणा माल घरोघरी पोहोचवण्याचे काम करतात. त्यांची डिलिव्हरी पार्टनर स्विगी ही कंपनी आहे. या परिसरात सर्वत्र रहिवाशी इमारती असताना, ही एकमेव जागा, व्यावसायिक वापरासाठी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिसरात एक किमीच्या अंतरावर पाच शाळा आहेत. या 'इन्स्टामार्ट' कंपनीत डिलिव्हरीसाठी दर तासाला किमान १०० डिलिव्हरी बॉईज येतात. दिवसभरात किमान दीड ते २ हजार बाईकची ये-जा असते.


हे वाचलंत का? - गेल्या १० वर्षांतील विकास फक्त ट्रेलर!


त्यांना फास्ट डिलिव्हरीचे टार्गेट असल्यामुळे रॅश ड्रायव्हिंग करतात, लहान मुले-महिलांचीही तमा बाळगली जात नागी. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. रात्री १२ पर्यंत डिलिव्हरी सुरू असते. पार्किंगची सुविधा नसल्यामुळे तेथे बाईकची गर्दी होते. कुणी हटकल्यास डिलिव्हरी बॉइज भांडण करतात. शिवाय लोडिंग-अनलोडिंग रात्रीच्या वेळेस चालते. त्यामुळे जोरजोरात आवाज होत असल्याने झोपमोड होते. विशेष म्हणजे महिलांकडेही वाकड्या नजरेने पाहिले जाते, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे दररोज दीड-दोन हजार अनोळखी व्यक्तींचा राबता असलेली ही कंपनी इतरत्र स्थलांतरित करावी, अशी विनंती स्थानिकांकडून गेल्या दीड वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात पोलिसांत तीन ते चार वेळा तक्रार दाखल करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शेवटी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग निवडला.


मंगलप्रभात लोढांनी काढला तोडगा

तीन ते चार वेळा पोलिसांत तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे शेवटी स्थानिकांनी या मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे धाव घेतली. लोढा यांनी प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ते तब्बल तीन तास आंदोलन स्थळी थांबले. त्यांनी पोलीस उपायुक्तांना बोलावून घेत कारवाईची सूचना केली. त्यानंतर काल संध्याकाळपासून डिलिव्हरी येणे बंद झाल्याची माहिती स्थानिक नागरिक मोहन पाटे यांनी दिली.


येथील नागरिकांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली असून, त्यांना पोलिसांनी सहकार्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठीच मी याठिकाणी भेट दिली. हा माझा मतदारसंघ आहे, येथील लोकांमुळे मी आमदार आहे. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये, ही माझी जबाबदारी आहे.
- मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य


त्यांच्या व्यवसायाला आमचा विरोध नाही. परंत, रात्रभर आवाज, अतिवेगाने चालणाऱ्या दुचाकी, महिलांसाठी असुरक्षित वातावरण आदींमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी अशी कुठेतरी जागा बघावी की स्थानिकांना त्रास होणार नाही. इतकाच आमचा प्रांजळ हेतू आहे.
- मोहन पाटे, स्थानिक नागरिक

 
Powered By Sangraha 9.0