मुंबई महापालिका शाळेत राबविणार 'किचन गार्डन' संकल्पना

01 Apr 2024 20:03:27
BMC Schools Kitchen Garden



मुंबई :    शहरात राहणाऱ्या मुलांना शेताबाबत माहिती नसते. त्यामुळे अशा मुलांना शेती विषयक ओढ निर्माण करण्याकरिता, शेती कशी करावी याचे धडे आता शाळेतच देण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका व जिल्हा नियोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने ऑरगॅनिक फार्मिंग (किचन गार्डन) ही संकल्पना येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवण्यात येणार आहे.
 
मुंबईसारख्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतात कोणती कामे केली जातात, शेती करणाऱ्या शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी नेमक्या कोणत्या, शेतीपूरक व्यवसाय नेमके कसे चालविले जातात याबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना शेतीविषयक माहिती आणि या क्षेत्राकडे ओढ निर्माण व्हावी या हेतूने शेतीविषयक शिक्षण देण्यात येणार आहे. याची सुरुवात आगामी शैक्षणिक वर्षापासून मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीची मदत घेतली जाणार आहे.


हे वाचलंत का? - कच्छथीवू बेट नेहरूंसाठी डोकेदुखी!, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा घणाघात


सुरुवातीला पालिकेच्या शहर विभागातील १०० शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिंग ही संकल्पना राबवून कोण कोणत्या प्रकारची शेती करावी, कोणत्या शेतीमध्ये सर्वाधिक उत्पन्न आहे. यासाठी होणारा खर्च, लागणारे साहित्य, शेतीचा कालावधी, शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. शेतीला रोगराईची भीती असल्यामुळे कोणती औषध फवारणी व अन्य शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतीची आवड निर्माण होईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ऑरगॅनिक फार्मिंग या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात क्षेत्रभेटीचे आयोजन करत विद्यार्थ्यांना शेती विषयक माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारा एखादा विद्यार्थी या क्षेत्राची आवड निर्माण झाल्याने पुढे जाऊन कृषी विद्यापीठात शेती विषयक पुढील शिक्षण घेऊ शकतो. शेती विषयक शिक्षण देताना विद्यार्थ्यांना महापालिकेच्या उद्यान खात्यातील तज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे. यासाठी राणीबागेतील उद्यानाचा पाहणी दौराही आयोजित करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.


Powered By Sangraha 9.0