'शैतान' ते 'क्रु', मार्च महिना थ्रिलरपटांचा बादशाह!

08 Mar 2024 12:50:27
मार्च महिन्यात प्रेक्षकांना थ्रिलर, रहस्य असे विविध आशय असणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. कोणते नक्की वाचा...
 

march movie 
 
प्रेक्षकांनी चित्रपटगृहात खुर्चीशी खिळून राहण्यासाठी त्यांना दमदार कथा, तगडं कास्टिंग आणि गुंतवून ठेवणारे संगीत असले ती रसिक प्रेक्षक तो थरारपट किंवा ससपेन्स चित्रपट उचलून धरतो. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं याचा अंदाज एकदा दिग्दर्शक आणि कलाकारांना आला की चित्रपट यशस्वी होण्यासाठीचा मार्ग नक्कीच मोकळा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत (Thriller Bollywood movies) बायोपिक, प्रेमपट, विनोदीपट या सगळ्यांच्या यादीत थ्रिलर (Thriller Bollywood Movie), ससपेन्स (Suspense movies) चित्रपटांची मार्च महिन्यात रांग लागली आहे. जाणून घेऊयात मार्च महिन्यात भेटीला येणाऱ्या थरारपटांबद्दल...
 
मार्च महिन्याची सुरुवातच किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ या चित्रपटाने झाली आहे. चित्रपटाची कथा ही दोन नवीनच लग्न झालेल्या जोडप्यांभोवती फिरते. ट्रेनमध्ये ही दोन्ही नवविवाहित जोडपी चढतात पण ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत मोठी गडबड होते ती कोणती हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. बऱ्याचदा मोठे स्टार कलाकार घेतल्यावरच चित्रपटाला यश मिळतेच असे नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न ‘लापता लेडिज’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक किरण राव आणि निर्माता आमिर खान यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय हिंदी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचा अभिनयातील शेवटचा चित्रपट ठरलेला ‘कागज २’ देखील प्रदर्शित झाला असून यात त्यांच्या सोबतीला अभिनेते अनुपम खेर देखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.
 
हे वाचलंत का? - अश्विनी भावे पुन्हा मोठा पडदा गाजवणार, महिला दिनानिमित्त चित्रपटाची केली घोषणा  
 
यानंतर जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजी बहुचर्चित ‘शैतान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदच अभिनेता आर माधवन आणि अजय देवगण या थ्रिलरपटातून एकत्र काम करताना दिसत आहेत. एका आनंदी कुटुंबात अनपेक्षितपणे अनोळखी व्यक्ती येते आणि ती ते कुटुंब उध्वस्त करते. यात ती ‘शैतान’ व्यक्ती काळी जादू आणि वशिकरणाचा वापर कसा करते, त्याचा दुष्परिणाम काय होतो हे या थरारपटात अनुभवायला मिळणार आहे.
 
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना देशावर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यात सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘योद्धा’ आणि अदा शर्मा हिच्या ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाची भूमिका सिद्धार्थ साकारत असून देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या असंख्य योद्ध्यांचे प्रतिनिधीत्व करणारा हा चित्रपट आहे. ‘योद्धा’ चित्रपटाची एक विशेष बाब म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहास पहिल्यांदाच या चित्रपटाचा ट्रेलर जमीनीपासून ३७,००० फुट उंचावरुन अर्थात विमानात प्रदर्शित करण्यात आला होता. तर अदा शर्मा हिचा ‘बस्तर’ चित्रपट ७६ सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्यावर आणि त्यातून होणाऱ्या सुडकथेवर भाष्य करणारा आहे. हे दोन्ही चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहेत.
 
यानंतर दिग्दर्शक म्हणून पहिल्यांच प्रेक्षकांसमोर येणाऱ्या रणदीप हुड्डा याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट मार्च महिन्याच्या चौथ्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अखंड भारत, हिंदुत्व, देश पारतंत्र्यातुन मुक्त व्हावा या सगळ्याबद्दल काय विचार होते, ते किती ताकदीचे देशभक्त होते या सर्व त्यांच्या जीवनप्रवासाचे चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आजवर वीर सावरकरांबद्दल ज्या गोष्टी कुठे सांगितल्या किंवा ऐकल्या गेल्या नसतील त्या मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे वक्तव्य अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने केले. हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  श्रेया बुगडे ‘या’ व्यक्तीच्या जीवावर मित्रांना घरी जेवायला बोलावते, श्रेयानेच केला खुलासा
 
तर मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा हा ग्लॅमरस असणार आहे. कारण अभिनेत्री तब्बू, करिना आणि क्रिती या तिघींची प्रमुख भूमिका असणारा ‘क्रु’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीच्या पिढ्या आपल्या अभिनय आणि सौदर्यांने गाजवणाऱ्या तीन्ही अभिनेत्री एकत्र आल्यावर काय गोंधळ घालणार आणि प्रेक्षकांच्या मनावर कशी भूरळ पाडणार हे ‘क्रु’ चित्रपटातून स्पष्टच होईल. या चित्रपटात तिघी हवाई सुंदरीच्या भूमिकेत दिसत आहेत.
 
सध्याच्या हिंदी चित्रपटसृष्टीतून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल एक निरीक्षण समोर येते ते म्हणजे प्रेक्षकांना कथेतील तोच रटाळपणा किंवा तिच प्रेमकथा पाहायला कंटाळा आला आहे. आणि त्याचमुळे वास्तविक चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळताना दिसत आहे. याशिवाय त्याचा थेट परिणाम हा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून येतोच. त्यामुळे डोक्याला, विचारांना चालना देणारे चित्रपट जर का प्रेक्षकांच्या भेटीला आणले तर आपोआपच प्रेक्षकांची हिंदी चित्रपटांना नाहीशी झालेली गर्दी पुन्हा दिसून येईल यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0