“निशिकांत कामत यांचा विश्वास आणि दृश्यममधील गायतोंडे भूमिका पदरात पडली”

08 Mar 2024 19:00:21
दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या ‘दृश्यम’ चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान उंचावली आहे. लवकरच या चित्रपटाचा हॉलिवूड रिमेक होणार आहे.
 
 
nishikant kamat 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकणारा ‘दृश्यम’ (Drishyam) हा चित्रपट होता. २०१५ साली निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले. प्रेक्षकांनी जितके प्रेम चित्रपटाच्या पहिल्या भागाला दिले त्याहून अधिक प्रेम त्यांनी ‘दृश्यम २’ Drishyam 2) या चित्रपटावर केले. चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यापैकीच एक म्हणजे सबइन्सपेक्टर गायतोंडे अभिनेते कमलेश सावंत (Drishyam) यांनी ही भूमिका साकारली असून त्यांच्या पदरात ही भूमिका कशी आली याबद्दलची आठवण त्यांनी महाएमटीबीशी बोलताना सांगितली.
 
निशिकांत कामत यांच्यामुळेच दृश्यम घडला...
 
“ ‘दृश्यम’ चित्रपटातील गायतोंडे या भूमिकेसाठी ऑडिशन मुंबई, गोवा, पुणे आणि कोल्हापूरात झालं. निशिकांत कामत यांच्या सोबत काम करण्याची संधी मला १९९८ पासून मिळाली होती. त्यामुळे एक नट म्हणून मी काय करु शकतो आणि काय नाही करु शकत याची जाणीव निशिकांत कामत यांना होती. आणि मुळात त्यांचा अट्टहास होता की ते दिग्दर्शित करत असलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात मी सबइन्सपेक्टर कमलाकर गायतोंडे ही भूमिका साकारावी. पण माझी स्टार प्रवाह वाहिनीवर लक्ष्य ही पोलिसांचीच एक मालिका सुरु असल्यामुळे मला तो चित्रपट करण्यात अडचण येत होती. पण कालांतराने अडचणी दुर झाल्या आणि मी ऑडिशन देऊन आल्यानंतर १०-१२ दिवसांत मला एक फोन आला आणि मला सांगितलं की गायतोंडे तुम्ही करत आहात. आणि अशाप्रकारे निशिकांत कामत यांचा माझ्या कामावरील विश्वास यशस्वी छरला आणि मला दृश्यम चित्रपटाचा भाग होता आलं”, असा किस्सा सांगत कमलेश यांनी त्यांच्या वाट्याला दृश्यम चित्रपट आणि गायतोंडे भूमिका कशी आली त्याबद्दल सांगितले.
 
वक्तशीरपणा आणि अमिताभ बच्चन
 
“खाकी, दीवार आणि असे लागोपाठ तीन हिंदी चित्रपट मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले. त्यापुर्वी मी मराठी चित्रपटात काम केलं नव्हतं. अमिताभ बच्चन म्हणजे व्यासपीठ आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे वेळेची कदर. खाकीच्या सेटवर ते ७ च्या कॉल टाईमला बरोबर ७ वाजता वेशभूषेसह तयार असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून शिस्तबद्धपणा, कामाप्रती आपुलकी आणि निष्ठा या बाबी नक्कीच शिकलो”, असे म्हणत तयांनी अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0