मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भीमाशंकर अभयारण्यातील (bhimashankar sanctuary) 'महादेव वन निसर्ग परिचय केंद्र' पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवार दि.८ मार्च रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निसर्ग परिचय केंद्राचे 'व्हिडीओ काॅन्फरन्स'व्दारे उद्घाटन केले (bhimashankar sanctuary). औषधी वनस्पतींसह बारा ज्योर्तिलिंगांच्या प्रतिकृतीने सजलेले हे 'निसर्ग परिचय केंद्र' भीमाशंकरला भेट देणारे भाविक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. (bhimashankar sanctuary)
भीमाशंकर अभयारण्याची ओळख म्हणजे तिथले महादेवाचे मंदिर आणि वनात घुमणारा शेकरूचा आवाज. दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक हे भीमाशंकर दर्शनाच्या निमित्ताने या अभयारण्याला भेट देत असतात. आता पर्यटकांना या अभयारण्यात पाहण्यासाठी नवे आकर्षण निर्माण झाले आहे. 'महादेव वन निसर्ग परिचय केंद्रा'च्या निमित्ताने अभयारण्यात आलेल्या पर्यटकांना इथल्या जैवविविधतेची इंत्यभूत माहिती मिळणार आहे. या केंद्रात पश्चिम घाटातील जैवविविधता, औषधी वनस्पती आणि वन्यप्राण्यांची माहिती देण्यात आली आहे. तेसच महादेव वनात बारा ज्योर्तिलिंगांचा नकाशा तयार करण्यात आला आहे.
शुक्रवारी या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, निवृत्त मुख्य वनसंरक्षक रविंद्र वानखेडे, भीमाशंकर देवस्थान संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक (मंचर) किशोर येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (भीमाशंकर १) वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी (भीमाशंकर २) भाऊसाहेब जवरे आणि वन कर्मचारी उपस्थित होते.