अमिताभ बच्चन १०० रुपयांची नोट पाहून निघून गेले, कमलेश यांनी सांगितला ‘खाकी’च्या सेटवरचा किस्सा

08 Mar 2024 18:29:56
राजकुमार दिग्दर्शित 'खाकी' चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत कमलेश सावंत झळकले होते.
 
amitabh bachchcan 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे केवळ पाहात अभिनयातील अनेक पिढ्या घडल्या आहेत. ज्या कलाकारांना अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्या प्रत्येकाने त्या संधीचे सोने केले आहेच. मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत (Kamlesh Sawant) यांनी लागोपाठ तीन चित्रपटांत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम केलं होतं. ‘महाएमटीबी’ पॉडकास्टमध्ये गप्पा मारताना कमलेश यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला.
 
वक्तशीरपणा आणि अमिताभ बच्चन
 
“खाकी, दीवार आणि असे लागोपाठ तीन हिंदी चित्रपट मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले. त्यापुर्वी मी मराठी चित्रपटात काम केलं नव्हतं. अमिताभ बच्चन म्हणजे व्यासपीठ आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे वेळेची कदर. खाकीच्या सेटवर ते ७ च्या कॉल टाईमला बरोबर ७ वाजता वेशभूषेसह तयार असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून शिस्तबद्धपणा, कामाप्रती आपुलकी आणि निष्ठा या बाबी नक्कीच शिकलो”, असे म्हणत तयांनी अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले.
 

khakee 
 
अभिनयाचे व्यासपीठ
 
‘खाकी’ चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले की, “खाकी चित्रपटाचे शुटींग सुरु असताना चाहते बच्चन साहेबांच्या सह्या घेण्यासाठी सेटवर आले होते. एकामागोमाग एक सर सह्या करत होते, अचानक त्यांच्यासमोर कुणीतरी १०० ची नोट पुढे केली. नोट पाहून ते आपल्या व्हॅनिटीमध्ये निघून गेले. अमिताभ बच्चन यांची ती कृती पाहून अक्षय कुमार यांना उत्सुकता लागली की त्यांनी असं का केलं. अक्षय यांनी जाऊन बच्चन सरांना विचारलं; त्यावर ते म्हणाले, कसं आहे ना अक्षय भारतीय नोटांवर फक्त देशाच्या गर्व्हर्नरची सही असते. त्यांचे हे बोल ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो”. त्यामुळेच कोणत्याही भाषेत काम करणारा कलाकार असो त्यांच्यासाठी अमिताभ बच्चन म्हणजे आदर्श आणि अभिनयाचे व्यासपीठ आहे, असेही कमलेश म्हणाले.
 
हे वाचलंत का? - अमिताभ बच्चन होणार अयोध्येचे रहिवासी, खरेदी केली कोट्यावधींची जमीन  
 
पुढे ‘खाकी’ चित्रपटाच्या आणखी काही आठवणींना उजाळा देत सांगितले की,”त्यावेळी व्हॅनिटी लांब असायच्या त्यामुळे चित्रिकरणाचा वेळ वाचावा म्हणून अमिताभ बच्चन रस्त्यात आडोशाला कपडे बदलत होते. अमिताभ बच्चन यांच्या साधेपणाबद्दल सांगताना एक आठवण अजून सांगताना कमलेश म्हणाले की, चित्रपटातील एका घटनेसाठी आम्हा पोलिसांच्या अंगावर लाल माती हवी होती, काही कारमास्तव मेकअप करणारी व्यक्ती जवळ नसल्यामुळे बच्चन साहेबांनी खाली वाकून तिथे जमीनीवर असणारी लाल माती घेतली आणि अंगाला लावली होती आणि त्यानंतर अक्षय कुमारसह आम्ही सगळ्यांनी देखील त्यांच्यापाठोपाठ ती कृती केली होती”.
Powered By Sangraha 9.0