दशकभरानंतर राज्याचे सर्वांगीण महिला धोरण जाहीर; वाचा सविस्तर
08 Mar 2024 17:54:32
महाराष्ट्र : महिला विकासासाठीचे सर्वांगीण, सर्वकष तसेच सर्वसमावेशक चौथे महिला धोरण राबविण्यात येत आहे. तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर राज्याला सर्वसमावेशक महिला धोरणांची आवश्यकता होती. त्यानुसार, आरोग्य, पोषण, आहार, स्वास्थ्य, शिक्षण व कौशल्य, महिलांप्रतीच्या सर्व हिंसाचारास आळा घालणे, इतर अन्य महत्त्वाच्या क्षेत्रात म्हणजे क्रीडा विश्वात भरीव योगदानाकरिता विशेष क्रीडा धोरणदेखील जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, मागील तीनही महिला धोरणांपेक्षा यंदाचे धोरण खास असणार आहे. सदर धोरणाचा अंमलबजावणी आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत प्रगती मोजण्याचे निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, शासनाच्या विविध विभागांना याबाबत जबाबदाऱ्यादेखील ठरवून देण्यात आल्या आहेत.
महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्य विशेष कृती दल, संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अंतर्गत अंमलबजावणी व सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
संबंधित सुविधा दुर्गम, दुर्लक्षित भागांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरी, ग्रामीण व आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, या बाबींचा समावेश यंदाच्या महिला धोरणात करण्यात आले आहे.
महिला धोरणाअंतर्गत महिला हिंसाचारास आळा बसणार आहे. यासाठी सर्व पोलिस मुख्यालयामध्ये भरोसा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
महिलांच्या राजकीय सहभागासाठी या धोरणात विशेष भर देण्यात आला आहे. निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना नियोजन, अर्थसंकल्प, व्यवस्थापन संनियंत्रण व मूल्यमापन इ. घटकांबाबत आराखडा तयार करून प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.