देशातील नवमतदार म्हणजेच १८ ते २० या वयोगटातील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन आहेत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीस पंतप्रधानांनी पुरस्कार दिला आणि त्याच्यासोबत अगदी आपल्याच भाषेत संवाद साधला, यामुळे हे नवमतदारही पंतप्रधान मोदींकडे आकर्षित होणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे नवमतदारांपर्यंत अतिशय नेमकेपणाने पोहोचण्याची अतिशय सटिक रणनीती पंतप्रधान मोदी यांनी आखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आपले वेगळेपणे सिद्ध केले, ते पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार’ देऊन. हे पुरस्कार २० श्रेणींमध्ये देण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ट कथाकथनकार, ख्यातनाम निर्माणकर्ता, ग्रीन चॅम्पियन, सामाजिक बदलासाठी उत्कृष्ट निर्माणकर्ता, सर्वात प्रभावी कृषी निर्माणकर्ता, सांस्कृतिक राजदूत, आंतरराष्ट्रीय निर्माणकर्ता, उत्कृष्ट प्रवास निर्माणकर्ता, स्वच्छतादूत, नव्या भारताचा चॅम्पियन, टेक निर्माणकर्ता, वारसा फॅशन आयकॉन, सर्वात कल्पक निर्माणकर्ता व निर्माणकर्ती यांसह खाद्य, शिक्षण, गेमिंग, मायक्रो, नॅनो तसेच आरोग्य व फिटनेस निर्माणकर्ता यांचा समावेश आहे.
याअंतर्गत अभी अॅण्ड न्यू, कीर्थीका गोविंदसामी, रणवीर अलाहाबादिया, पंक्ती पांडे, मैथिली ठाकूर, जया किशोरी, लक्ष्य दाबस, ड्—यू हिक्स, कामिया जानी, मल्हार कळंबे, जान्हवी सिंह, श्रद्धा, आरजे रौनक, कविताज किचन, नमन देशमुख, अमन गुप्ता आणि अन्यांचा समावेश आहे. ही नावे वरवर पाहता, सर्वसामान्य वाटत असली, तरी ‘समाजमाध्यमांमधील सेलिब्रिटी असे यांना म्हणता येईल. यातील प्रत्येक जण ’फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘एक्स’ आणि ‘युट्यूब’ आदी व्यासपीठांवर एक लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स, लाईक्स, रिपोस्ट बाळगून आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे, देशातील नवमतदार म्हणजेच १८ ते २० या वयोगटातील मतदार त्यांचे फॅन आहेत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीस पंतप्रधानांनी पुरस्कार दिला आणि त्याच्यासोबत अगदी आपल्याच भाषेत संवाद साधला, यामुळे हे नवमतदारही पंतप्रधान मोदीप्रति आकर्षित होणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे नवमतदारांपर्यंत अतिशय नेमकेपणाने पोहोचण्याची अतिशय सटिक रणनीती पंतप्रधान मोदी यांनी आखली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढील सहा ते सात दिवसांमध्ये होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. पक्षाच्या नवी दिल्लीतील पं. दीनदयाळ मार्गावरील मुख्यालयात सध्या रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू असते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष हे या बैठकांचे संचालन करतात. दर दिवशी प्रत्येक राज्याची सुकाणू समिती या तीन नेत्यांसमोर आपापल्या राज्यातील स्थिती मांडत असतात. अर्थात, ही केवळ एक औपचारिकता नसते, तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे विश्लेषण, तेथील विविध प्रवाह, तेथील संभाव्य उमेदवार, गतवेळची स्थिती आणि यंदाची स्थिती अशी सविस्तर माहिती राज्यांचे नेते देत असतात.
भाजपतर्फे अतिशय बारकाईने उमेदवारी ठरविण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. ’नमो अॅप’वर (नरेंद्र मोदी अॅप) लोकांकडून खासदारांबद्दल प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यादरम्यान आपापल्या भागातील भाजपच्या सर्वाधिक लोकप्रिय तीन नेत्यांची नावे विचारण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भाजप खासदारांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवला जात होता. सर्वेक्षण संस्थांकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा अहवाल मागविण्यात आला होता. भाजपशासित राज्यांमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मंत्र्यांचे प्रवास निश्चित करण्यात आले होते. या मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघांना भेट देऊन, खासदारांचा अहवाल घेण्यास सांगण्यात आले. मंत्री व संघटनेकडून प्राप्त झालेला अहवाल राज्यस्तरावरील निवडणूक समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला.
राज्यांच्या निवडणूक समित्यांच्या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी प्रत्येक राज्याच्या सुकाणू समितीसोबत शाह-नड्डा-संतोष यांच्यासोबत बैठक होते आणि प्रत्येक जागेसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात येते. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांच्यामध्येही बैठक होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यनिहाय उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात येते. त्यामुळे भाजपने प्रत्येक जागेनुसार सूक्ष्म रणनीती तयार केली आहे. प्रत्येक जागेवर विजयी उमेदवार कोण असू शकतो, याकडे विशेष देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्या खासदारांची कामगिरी चांगली नाही, त्यांना उमेदवारी नाकारण्यात येते.
अशाच एका बैठकीत बुधवारी ज्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचा तिढा असल्याचे चित्र दिसत असले, तरीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा प्रश्न अतिशय कुशलतेने सोडवला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची लवकरच घोषणा होईल.
भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यासाठी बैठकांना प्रारंभ केला आहे. काँग्रेस पक्षाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. त्यानंतर शुक्रवारी यादी जाहीर केली गेली. या बैठकीत लोकसभेच्या १०० ते १२५ जागांवर चर्चा झाल्याचे समजते. दक्षिणेकडील राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंडमधील काही जागांवर चर्चा झाली. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच निवडणूक लढविणार आहेत. पण, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशीही चर्चा रंगील होती. तसे झाले असते तर त्यांचा सामना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी सलग तिसर्यांदा पाहायला मिळाला असता. गेल्या वेळी राहुल गांधींचा अमेठीतून ५५ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता.
अमेठीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी राहुल अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत पक्षाकडून लवकरच घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले होते. त्यासाठी अमेठीत तयारी सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, वायनाडमध्ये डाव्या पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला असल्याने, आता राहुल गांधी कर्नाटक अथवा तेलंगणमधूनही निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. परंतु, राहुल गांधी यांनी आव्हानात्मक अमेठीचा मार्ग न धरता वायनाडलाच पसंती दिल्याचे दिसते.
दुसरीकडे राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका गांधी त्यांच्या घराण्याचा मतदारसंघ मानल्या जाणार्या रायबरेली येथून निवडणूक लढवू शकतात, अशी जुनीच चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राज्यसभेवर जाण्याने, गांधी कुटुंबाची ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने रायबरेलीमधून उमेदवारी जाहीर केलेली नाही. काँग्रेसच्या निर्णयावर भाजप लक्ष ठेवून असल्याचे दिसते. काँग्रेस आपले सर्व बडे चेहरे लोकसभेत उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यात अनेक बड्या प्रादेशिक नेत्यांच्या नावांचीही चर्चा आहे. यामध्ये राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, माजी मंत्री टीएस सिंह देव ते अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत, कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ, उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या नावांची चर्चा आहे. तेव्हा, पुढील काही दिवसांत देशभरातील लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे चित्र पुरेसे स्पष्ट झालेले असेल. त्यानंतरच खर्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव अधिक रंगात येईल.