"मातोश्रीसाठी हफ्ते गोळा करण्यासाठी राऊतांची धडपड!"

07 Mar 2024 13:35:24

Sanjay Raut


मुंबई :
ऑनलाईन लॉटरीचे हफ्ते सरकारला जात आहेत की, संजय राऊतांना मातोश्रीसाठी हफ्ते जमा करायचे आहेत याबद्दलचे पुरावे माझ्याकडे येत आहेत, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना ऑनलाईन लॉटरी आणि जुगारासंदर्भात पत्र लिहीले. याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले.
 
नितेश राणे म्हणाले की, "ऑनलाईन लॉटरी आणि जुगारासंदर्भात संजय राजाराम राऊतांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं. पण हे अचानक असं पत्र लिहिण्याचं कारण काय? ऑनलाईन लॉटरी आणि जुगार हा तर महाविकास आघाडीच्या काळातही चालायचा. परंतू, आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून यांच्याकडून हफ्ते गोळे करायचे. तसेच त्यांना घाबरवून त्यांच्यात भीती पसरवायची आणि उबाठा गटाला एवढा निधी द्या, असा संदेश देण्याच्या हेतूने ते पत्र लिहिलेलं आहे."
 
हे वाचलंत का? - मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"अशाच पद्धतीने कंपन्यांना धमकवून चंदा गोळा करणे हाच या उबाठाच्या नेत्यांचा धंदा आहे. त्यांना समाजाविषयी काहीही पडलेलं नाही. त्यांच्याकडे आज सत्ता नसल्यामुळे वसुलीचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन लॉटरीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना अशा प्रकारे भीती दाखवून त्यांच्याकडून पैसा गोळा करणे हा स्पष्ट हेतू राऊतांच्या पत्रामागे दिसतो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "यासंदर्भात कोणाला, कुठून आणि कसे फोन गेले याबद्दल लवकरच मी काही खुलासे करणार आहे, जेणेकरुन गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा मुख्य हेतू बाहेर येईल. ऑनलाईन लॉटरीचे हफ्ते सरकारला जात आहेत की, संजय राऊतांना मातोश्रीसाठी हफ्ते जमा करायचे आहेत याबद्दलचे पुरावे माझ्याकडे येत आहेत. महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे आणि उबाठा महाविकास आघाडीमधून निवडणुक लढवेल का? हा पिक्चर लवकरच बाहेर येईल," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0