तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यापासूनच एक सशक्त ब्राह्मणविरोधी प्रवाह आहे. अलीकडच्या काळात ब्राह्मणविरोधाने हिंदू म्हणजे सनातन धर्मविरोधी रूप घेतले. भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून, देशात हिंदू परंपरांना नव्याने आदर मिळायला लागला असताना, तामिळनाडूत हिंदूविरोधी राजकारणानेही उसळी मारली. तामिळनाडूत भाजपच्या वाढत्या जनपाठिंब्याचा हा परिणाम. पण, सनातन धर्माचा आंधळा विरोध हा घटनाद्रोह आहे, याची जाणीव आता तेथील नेत्यांना न्यायालयानेच करून दिली, हे स्वागतार्ह.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे अपरिपक्व पुत्र व कॅबिनेट मंत्री उदयनिधी यांना आता मद्रास उच्च न्यायालयानेही चपराक लगावली. उदयनिधी यांनी केलेल्या सनातन धर्माविरोधी वक्तव्यांविरोधात त्यांच्यावर देशाच्या विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. त्यापैकी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. सुमंत यांनी हिंदू धर्माला मलेरिया, डेंग्यू वगैरे संबोधणे राज्यघटनेच्या तत्त्वांविरोधात असल्याचे मत व्यक्त केले. सनातन धर्माची तुलना मलेरिया-डेंग्यूसारख्या रोगांशी करून, या रोगांप्रमाणेच सनातन धर्माचेही उच्चाटन केले पाहिजे, असे मत उदयनिधी यांनी अलीकडेच जाहीरपणे व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशात मोठा वादंग उत्पन्न झाला. उदयनिधी यांच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले. या विविध खटल्यांना एकाच न्यायालयात चालवावे, अशी याचिका उदयनिधी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यावर सुनावणी घेताना, सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांच्यावर कठोर ताशेरे मारले. तुम्हाला दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून, तुम्ही इतरांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ला करू शकत नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांची ही मागणी साफ फेटाळून लावली.
तुम्ही नेते आहात आणि आपल्या अशा वक्तव्यांचे काय परिणाम होऊ शकतात, याची तुम्हाला चांगलीच कल्पना असते. त्यामुळे इतरांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ला करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे ताशेरे मारीत, सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आता मद्रास उच्च न्यायालयानेही त्यांचे कान टोचले आहेत. भारताचे संविधान धार्मिक स्वातंत्र्य बहाल करते; पण कोणत्याही धर्माला मलीन करण्याचे स्वातंत्र्य देत नाही, असे सांगून उच्च न्यायालयाने उदयनिधी यांना इशारा देताना सांगितले की, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करीत, एखाद्या धर्माचे उच्चाटन करण्याची भाषा संविधानाला मान्य नाही.उदयनिधी अशा प्रकारचे विधान केवळ सनातन धर्माबाबतच करू शकतात. अन्य धर्माबाबत असे विधान करण्याची त्यांची हिंमत आहे का, असा प्रश्न उपस्थित करता येईल. याचे कारण त्यांनी अन्य धर्माबाबत असे विधान केले असते, तर ‘सर तन से जुदा’चे नारे लागले असते. कदाचित उदयनिधी यांना उर्वरित आयुष्य लपूनछपून काढावे लागले असते. पण, हिंदू हा स्वधर्म विरोधकांबाबतही सहिष्णू असल्यानेच, उदयनिधी यांना कायद्याद्वारेच शिक्षा देण्यासाठी, त्यांच्यावर खटले भरले जात आहेत, हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
तसेच उत्तर प्रदेशातील बरेली न्यायालयातील न्या. रवीकुमार दिवाकर यांनी बरेलीतील दंगलीच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना, राज्यकर्ते धार्मिक प्रवृत्तीचे असावेत, असे सांगत यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उदाहरण दिले. धार्मिक वृत्तीचे नेते सत्तेच्या केंद्रस्थानी असतील, तर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात, असे सांगत न्या. दिवाकर यांनी धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीचे जीवन त्यागपूर्ण असते, असे सांगत योगी आदित्यनाथ यांचे उदाहरण दिले. योगीजींनी आपल्या नि:स्वार्थी वागणुकीने हे सिद्ध केले असल्याचे न्या. दिवाकर म्हणाले. खरे तर देशवासीयांना राष्ट्रीय स्तरावरही नरेंद्र मोदी यांच्यामुळे या सत्याचा अनुभव येत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असो.तामिळनाडूच्या राजकारणात रामस्वामी पेरियार नायकर यांच्या प्रेरणेमुळे ब्राह्मणविरोधी मतप्रवाह पूर्वीपासूनच सशक्त होता. त्याला तामिळ संस्कृती आणि भाषा यांच्या कट्टर अस्मितेची जोड लाभल्यानंतर पेरियारवादी विचारसरणीने सनातनविरोधी आणि भारतविरोधी फुटीरतावादी स्वरूप घेतले. तामिळनाडूत उत्तर भारतातील कोणताही पक्ष राजकीयदृष्ट्या रुजत नाही, याचे कारण तामिळी अस्मितेचा हा अतिरेकी अभिमान आहे. तेथील राजकारणात आता ब्राह्मणांना कोणतेही स्थान उरलेले नाही.
द्रमुक हा पक्ष या अतिरेकी तामिळी अस्मितेचे राजकीय प्रतीक. द्रमुकच्या करुणानिधी यांनी ही अस्मिता इतकी टोकाला नेली होती की, तिने द्रमुकला फुटीरतावादी पक्ष बनविले होते. श्रीलंकेतील व्ही. प्रभाकरन याच्या ‘एलटीटीई’ या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. सुदैवाने श्रीलंकेने प्रभाकरनसह या संघटनेचाच समूळ उच्छेद केल्यामुळे, ते संकट टळले असले, तरी आता द्रमुक आपणच वाढविलेल्या या अतिरेकी अस्मितेच्या राजकीय सापळ्यात अडकला आहे. राज्यातील अन्य द्राविडी पक्ष कमी-अधिक प्रमाणात तामिळी अस्मितेचे राजकारण करीत असले, तरी त्यांच्यातही आता याबाबत मवाळपणा दिसून येऊ लागला आहे. मात्र, तामिळनाडूत सनातन धर्माच्या बाजूनेही तितकाच सशक्त प्रवाह आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता जीवंत असेपर्यंत त्यांनी सनातनच्या बाजूने असलेल्या भाजपशी राजकीय सोयरिक केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर सनातनवादी राजकीय विचारसरणीचा राजाश्रय पोरका झाला. पण, ही पोकळी भरून काढण्यात, भाजपला बर्याच अंशी यश येत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपसारख्या ‘बाहेरच्या’ पक्षाला वाढत चाललेला पाठिंबा हा त्याचा पुरावा आहे. या कामी भाजपला के. अण्णामलाई यांच्या सशक्त नेतृत्वाचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांनी काढलेल्या पदयात्रेला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात तिची सांगता झाली.
भाजपच्या वाढत्या प्रभावामुळेच द्रमुक नेतृत्वात अस्वस्थता वाढत चालली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात अंतर्गत फाटाफूट पडून, तो पक्ष कमकुवत झाला होता. पण, सनातनवादी विचारसरणीला पुन्हा तामिळनाडूच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे जोरदार प्रयत्न भाजपने केले आणि त्यात त्याला बर्यापैकी यश येत आहे. एक बिगर द्रविडी पक्ष राज्यात आपला जम बसवू लागल्याचे पाहिल्यामुळेच, उदयनिधी यांनी पुन्हा एकदा सनातनविरोधाची गरळ ओकली होती. उदयनिधी यांच्या सनातनविरोधी वक्तव्यांची प्रेरणा ही अशी राजकीय होती; पण ती त्यांच्याच अंगावर शेकली. यापुढे जनता किंवा न्यायालये अशा प्रकारचा हिंदूद्वेष खपवून घेणार नाहीत, हेही या घटनेने दाखवून दिले. आधी सर्वोच्च आणि आता मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचे कान उपटले आहेत. त्यामुळे हिंदूद्वेषाला बर्याच अंशी चाप बसेल, इतके निश्चित.