९६ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण भारतीय चित्रपटप्रेमींना डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार
मुंबई : जगभरातील कलाकारांसाठी सर्वात महत्वाचा आणि मानाचा पुरस्कार म्हणजे ऑस्कर (Oscar2024). ९६ व्या ‘ऑस्कर २०२४’ पुरस्कार (Oscar2024) सोहळ्याबद्दल आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची दरवर्षी कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा लॉस एंजेलिसमध्ये १० मार्चला रंगणार असून या पुरस्कार (Oscar2024) सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतात ११ मार्चला पाहता येणार आहे.
कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये येत्या १० मार्च रोजी ऑस्कर सोहळ्याचा भव्य रेड कार्पेट सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा भारतीय वेळेनुसार ११ मार्च २०२४ रोजी पहाटे ४ वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
९६ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमर चित्रपटाला एकूण १३ नामांकने मिळाली आहेत. याशिवाय ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांमध्ये देखील चांगलीच चुरस रंगताना दिसणार आहे.