हैती, हिंसा आणि हत्या...

06 Mar 2024 21:04:06
 Haiti, gang violence renders thousands homeless


ख्रिस्तीबहुल असलेल्या हैती देशात येशूच्या दया, करुणेचे बस्तान काही बसलेले दिसत नाही. नुकतेच दि. ४ मार्च रोजी हैती देशाची राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्स येथे सशस्त्र गटाने दोन तुरुंगांवर हल्ला केला. या हल्ल्यात तुरुंगातले पोलीस अधिकारी तसेच काही कैदी मेले. मात्र, या हल्ल्याची भीषणता म्हणजे, या संधीचा फायदा घेत, ३ हजार ७०० गुन्हेगार या तुरुंगातून पसार झाले. चोरी, बलात्कार, दरोडा, लुटालूट, खून वगैरे केलेले हे गुन्हेगार मोकाट सुटले. हजारो गुन्हेगार असे खुले सुटल्यामुळे, देशाच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेच आहेत, यात संशय तो काय!

हैतीचा प्रमुख दशहतवादी म्हणून गणला गेलेला, जिमी चेरिजियर याने हा हल्ला केल्याचे मान्य केले. सध्या हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री हे नैरोबीच्या दौर्‍यावर आहेत. केनियाच्या ’मल्टीनॅशनल सिक्युरिटी फोर्स’ने हैतीमध्ये येऊन, हिंसाचाराविरोधात कमान सांभाळावी, याबाबत एरियन हेन्री यांनी केनियन सरकारशी चर्चा केली. मात्र, केनियामधून ही सुरक्षा दल येणार म्हणून हैतीचे दहशतवादी गट अस्वस्थ झाले. त्यामुळेच हैतीच्या तुरुंगावर हल्ले करून, गुन्हेगारांना मोकाट सोडण्याचे षड्यंत्र रचले गेले.तसे पाहायला गेले, तर हैतीच्या बाबतीत म्हणायचे, तर या देशात कायदा-सुव्यवस्थेचे याआधीच दिवाळे निघालेले. दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ’संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने हैती सरकारला समर्थन म्हणून आंतरराष्ट्रीय मिशनला परवानगी दिली. मात्र, हैतीच्या अस्थिर परिस्थितीमुळे आणि तेथील भीषण हिंसेमुळे हे मिशन काही परिपूर्ण झाले नाही. हैतीमध्ये सध्या भयंकर परिस्थिती. एकट्या २०२३ साली हैतीमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त लोक हल्ल्यात मृत्युमुखी पडले. येथे २०० पेक्षा जास्त दहशतवादी सशस्त्र गट आहेत, जे हैतीच्या विद्यमान सरकारविरोधात सशस्त्र भूमिका घेतात. गृहयुद्ध कायम पेटलेले.

हैतीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास होऊ नये, शांतता प्रस्थापित होऊ नये, यासाठी हे गट कायमच हैतीच्या नागरिकांवर हल्ले चढवतात. निष्पापांचा बळी घेतात. यामध्ये महिलांच्या जीवनावर जो दुष्परिणाम झाला आहे, त्याबद्दल तर शब्दच नाहीत. समाजात दहशत निर्माण व्हावी; तसेच जनता हैती सरकारच्या विरोधात जावी म्हणून हे दहशतवादी गट महिलांवर अत्याचार करतात. हैतीमध्ये महिलांवर बलात्कार झाला की, महिलांनाच दोषी ठरवून, तिचा त्याग करायचा, अशी एक पद्धत रूढ आहे. त्यामुळे अत्याचार झालेल्या मुली-महिलेला तिचा परिवार वार्‍यावर सोडून देतो. या अत्याचार पीडित मुली-महिलांचे काय होत असेल? दुसरीकडे, अस्थिरतेमुळे विकासात्मक काम नाहीत. उद्योगधंदे स्थिरावत नाहीत. त्यामुळे बेकारी आणि दारिद्य्राची चलती. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे, बालकांचे कुपोषण येथे सर्वसामान्य बाब. थोडक्यात, हैतीचे नागरिक कोणत्याच आघाडीवर सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगू शकत नाहीत. त्यांच्या वाट्याला हिंसा, दारिद्य्र आणि अस्थिरताच आहे.

हैतीमध्ये मानवनिर्मित संकंटांची साखळी सुरू असतानाच, नैसर्गिक आपत्तीही पाचवीला पूजलेली. गेल्याच वर्षी हैतीमध्ये कॉलराने हैदोस घातला. पिण्याच्या पाण्याची अस्वच्छता, मूलभूत सुविधांची वानवा यांमुळे पटकीच्या आजाराने हैतीचे नागरिक किड्यामुंग्यासारखे मेले. या महामारीमध्ये विद्यमान पंतप्रधान एरियन हेन्री यांचे प्रशासन अपयशी ठरले असे म्हणत, हैतीचे दहशतवादी गट रस्त्यावर उतरून हिंसा करत होते. गेले अनेक वर्षं नव्हे, तर हैतीच्या ज्ञात इतिहासामध्येच तिथे मानवी हक्कांचे नेहमीच उल्लंघन झालेले. स्पेन आणि फ्रान्स यांसारख्या पाश्चात्य देशांचे हैतीवरील आक्रमण आणि सत्ता, त्यानंतर मूळ हैतीतील ताईनो लोकांचा नरसंहार आणि त्यानंतर आफ्रिकेतील लोकांचा गुलाम म्हणून केलेला वापर. सध्या तेथे आफ्रिकन वंशाचे लोक अधिक. थोडक्यात, हैतीच्या नशिबी ज्ञात इतिहासात कधीच शांतता नव्हती. दुःखद घटनांनी हैतीचा इतिहास काळवंडलेला. कॅरेबियन राष्ट्र म्हणून हैतीला मान्यता मिळाल्यावर, हैतीची दुर्दशा थांबलेली नाही. हैतीमधला मूळ ताईनो समूह नष्टच झाला. आता तिथे ख्रिस्तीबहुलताच. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न असाही पडतो की, हैतीमधील मारणारेही ख्रिस्ती आणि मरणारेही ख्रिस्ती. मग असे असूनही तिथे चर्चसंस्था किंवा पोप लक्ष का देत नाहीत? याचे उत्तर नाही. तूर्तास जागतिक महासत्ता हैतीबद्दल काय भूमिका घेतील, हे पाहणे महत्त्वाचे.

 
- योगिता साळवी
Powered By Sangraha 9.0