मुंबई : महाशिवरात्रीनिमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी काही अतिरिक्त बसगाड्यांची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. 'कान्हेरी गुंफा' येथील पुरातन लेण्यांना भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बस क्र. १८८ मर्या. या बसमार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत एकूण सहा जास्तीच्या बसगाडया सोडण्यात येणार आहेत. याशिवाय बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा दरम्यान नियमित बससेवादेखील सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार, एलोरा चौकी (बोरिवली स्थानक-पूर्व) तसेच कान्हेरी गुंफा येथे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत यादरम्यान बस क्र. ५७, ६७ आणि १०३ या बसमार्गावर एकूण ६ जादा बसगाडया चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. तसेच बाबुलनाथ मंदिर येथे भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक अधिकारी व बसनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही बेस्टने म्हटले आहे. तरी भाविकांनी या अतिरिक्त बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्यावतीने करण्यात आले आहे.