मुंबई : लोहमार्ग पोलीस, मुंबई आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि व्हीजेटीआय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त 'खाकीतील सखी विशेष अभियान' दि. ५ मार्च रोजी वडाळा रेल्वे स्थानक येथे राबविण्यात आले.
व्हीजेटीआय प्रथम वर्ष बी.टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समाजकार्य विषय शिकवितांना समाजातील सामाजिक वास्तवाची जाणीव व्हावी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य, राष्ट्रप्रेम, सेवाभाव विषयाची रुजवणूक करावी, यासाठी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून हा उपक्रम घेण्यात आला.
हे वाचलंत का? > >
ठाणे महापालिका मुख्यालयातील वाचनालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्मिता ढाकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व विद्यार्थ्यांनी 'महिला आणि बालक सुरक्षा' या विषयावर पथनाट्य सादर केले.
तसेच, काही विद्यार्थ्यांनी रेल्वे पोलीस हेल्पलाईन, खाकीतील सखी आणि अन्य अभियान या विषयावर जनसामान्यात जनजागृती केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्हीजेटीआयमधील प्रा. देशपांडे, प्रा. कृष्ण कनकगिरी, प्रा. सचिन बर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले.