ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निर्सग वाचनालय,पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘वाचनाचा कोपरा’ हे उपक्रम आकाराला येत असतानाच 'चला वाचूया' या मोहिमेत आणखी एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर तयार केलेल्या छोटेखानी वाचनालयाला वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे वाचलंत का? >>
झोपडपट्टी पुनर्विकासासाठी MMRDA आणि SRA संयुक्त भागीदारी करार
ठामपा आयुक्त कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी असलेल्या प्रतिक्षालयात हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे.या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकिरा या सारख्या कादंबऱ्या, खरेखुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी यांच्यासह नटसम्राट, अग्रिपंख, प्रकाशवाटा, एक होता कार्व्हर आदी पुस्तके या वाचनालयात आहेत. त्यांच्या जोडीला, सेपिअन्स, ब्लॅक स्वॅन, इलॉन मस्क, इकेगाई आदी इंग्रजी पुस्तकेही येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत.
मोबाईलच्या छोट्या स्क्रीनने आपले दैनंदिन आयुष्य पूर्णपणे व्यापले आहे. मात्र तरीही छापील वर्तमानपत्र, पुस्तक वाचण्याची आपल्यात असलेली नैसर्गिक उर्मी आजही कायम आहे. त्याला सकारात्मक उर्जा देण्यासाठी समोर पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असली पाहिजेत. या प्रतिक्षालयात जो काही वेळ लागतो तो वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरावा, अशी या वाचनालयामागची प्रेरणा आहे, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.
सुलेखनाने सजल्या भिंती
या वाचनालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रतिक्षालयाच्या भिंतींवर, आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेले सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या अक्षरशिल्पांच्या चित्रप्रतिमा विराजमान झाल्या आहेत. वाचनासंबंधींचे थोरामोठ्यांच्या विचारांसोबतच अक्षर, शब्द यांचे विभ्रम पालव यांनी सुलेखनातून सुरेख साकारले आहेत.