"ज्यांना कोणीही नाही, तेही मोदींचे आणि मोदीही त्यांचेच"

लालू यादव यांच्या टीकेवर मोदींचे सडेतोड प्रत्युत्तर

    04-Mar-2024
Total Views |
 modi ka parivar
 
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोशल मीडियावर त्यांचा बायो बदलला आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या बायोमध्ये त्यांच्या नावापुढे 'मोदींचे कुटुंब' (modi ka parivar) असे लिहिले आहे.
  
पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाचा उल्लेख करत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. लालू यादव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि मोदींसोबत एकजूट दाखवण्यासाठी भाजप नेत्यांनी आपल्या बायोमध्ये बदल केला आहे. रविवारी, दि. ४ फेब्रुवारी २०२४ बिहारमध्ये जनविश्वास महारॅलीदरम्यान आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली होती.
 
 
पाटण्यातील गांधी मैदानावर आयोजित सभेत लालू प्रसाद यादव म्हणाले, 'हे काय मोदी आहे? नरेंद्र मोदी घराणेशाहीवर बोलत आहेत, पण त्यांना कुटुंब आणि मुले का नाहीत हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना ते (पीएम मोदी) घराणेशाहीचे राजकारण म्हणत आहेत. तुमचे कुटुंब नाही... तुम्ही हिंदूही नाही. प्रत्येक हिंदूला त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याला मुंडन करावे लागते. पण तुम्ही दाढी आणि केस का कापले नाहीत, या प्रश्नाचे उत्तर द्या."
 
लालूंच्या आरोपावर तेलंगणातील जाहीर सभेत मोदींनी उत्तर दिले. ते म्हणाले की, 'भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात बुडालेले विरोधी आघाडीचे नेते अस्वस्थ होत आहेत. जेव्हा मी त्यांच्या घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा हे लोक आता मोदींना कुटुंब नसल्याचे म्हणू लागले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की १४० कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. ज्यांना कोणीही नाही, तेही मोदींचे आणि मोदीही त्यांचेच. माझा भारत माझा परिवार आहे."
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.