जंगलांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या, वाढत चाललेला निसर्गाचा र्हास या गंभीर समस्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून अवघे जग सामोरे जात आहे. याचा धक्का केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवी जीवनचक्रावरही जाणवताना दिसतो. दुसरीकडे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे, ही बाब पुन्हा एकदा एका बातमीच्या अनुषंगाने अधोरेखित झाली आहे.
अटलांटिकच्या (द. अमेरिका) जंगलांमधील सर्वांत लहान वाघ-मांजरीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सातत्याने मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड या वाघ-मांजरीच्या जीवावर उठली आहे. म्हणूनच दाक्षिणात्य वाघ-मांजर (Leopardus guttulus) या ’मार्जार’ कुळातील प्राण्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्न निर्माण झाले आहे. हा प्राणी पॅराग्वे, ब्राझील, अर्जेंटिना आणि बोलिव्हियाच्या सीमेवर असलेल्या अटलांटिक जंगलापुरताच मर्यादित आहे. ’आययुसीएन’ म्हणजेच ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या लाल यादीत ‘व्हलनरेबल’ म्हणजेच ‘असुरक्षित वर्गा’त आहे. पण, पॅराग्वेमध्ये जंगली मांजराची स्थिती अधिक गंभीर आहे; कारण तिथे ती ‘इन्डेंजर्ड’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. या जंगली मांजरीवर अजूनही फारसे संशोधन आणि अभ्यास झालेला नाही. त्यामुळे तिच्याविषयी फारच कमी माहिती सध्या उपलब्ध आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये, पॅराग्वेने प्रथमच (ODESUR) ’दक्षिण अमेरिकन गेम्स’चे आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये प्रतिनिधित्वासाठी या जंगली मांजरीच्या चिन्हाचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे अनेक सकारात्मक परिणाम झालेले पाहायला मिळाले. पाळीव मांजरीपेक्षा किंचित मोठी, पिवळ्या रंगाची, काळे डाग असलेली ही मांजर अटलांटिक जंगलात आढळते. पॅराग्वेपासून अगदी अर्जेंटिना आणि ब्राझीलपर्यंत पसरलेल्या या प्रदेशातून अगदी बोलिव्हियाच्या पूर्वेकडील टोकापर्यंत या प्राण्याचा वावर आढळतो. ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN)ने सांगितले आहे की, या मांजरींची एकूण लोकसंख्या सुमारे सहा हजार असून, हा प्राणी असुरक्षित म्हणून सूचिबद्ध करण्यात आला आहे. ‘दाक्षिणात्य जंगली मांजरे’ (Southern wild cats) ज्या अटलांटिकच्या जंगलात आपले वास्तव्य करतात, त्या ठिकाणी मार्गे (margay) आणि ऑसेलट (ocelot) अशा आणखी दोन प्रजातीही आढळतात.
बर्याचदा या तिन्ही प्रजातींना एकच संबोधण्याची चूक केली जाते; मात्र या तिन्ही प्रजाती वेगवेगळ्या आहेत. वरवर पाहता, या मांजरीच्या तिन्ही प्रजातींमध्ये सारखेपणा दिसत असला, तरी त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्या वेगळ्या प्रजाती ठरतात.मोठ्या प्रमाणावर आपला अधिवास गमावलेल्या, या दाक्षिणात्य जंगली मांजरीच्या या प्रजातींना पॅराग्वेमधील तीन सर्वांत धोकादायक प्रजाती म्हणून ‘जग्वार’ (पँथेरा ओन्का) आणि मार्गेमध्ये त्या सामील झाल्या आहेत.फारच कमी संशोधन झालेल्या, या प्रजातीविषयी एक वन्यजीव अभ्यासक असे सांगतात की, जंगली मांजरीच्या या प्रजातीला एका जंगलातून दुसर्या जंगलातील प्रदेशामध्ये फिरण्याची सवय असते. पण, मोठ्या प्रमाणावर झालेल्या जंगलतोडीमुळे या मांजरींचे फिरणे आणि त्यांचे मार्ग यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. बेकायदेशीर गांजाच्या लागवडीमुळे तसेच जंगलामधून होणार्या अवैध तस्करीमुळे ‘मार्जार’ कुळातील सर्वांत लहान असलेल्या मांजरांपैकी एक अशा जंगली मांजरीला धोका निर्माण झाला असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
एखाद्या प्रजातीच्या संवर्धनासाठी तसेच तिच्या संरक्षणासाठी संशोधन आणि अभ्यास यांना फार महत्त्व असते. दहा वर्षांपूर्वीही या प्रजातीला एक वेगळी प्रजाती, असा दर्जा दिला गेला नव्हता. मात्र, त्यानंतर तो दिला गेला. परंतु, या प्रजातीवर अद्याप म्हणावे तसे संशोधन आणि अभ्यास केला गेला आहे. या जंगली मांजरींच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्यामागे, त्यांचा अधिवास नष्ट होण्याबरोबरच दुर्लक्षित संशोधनाचा भागही एक कारण ठरत आहे. त्यामुळे जितके अधिकाधिक संशोधन आणि अभ्यास या प्रजातीवर, तिच्या अधिवासावर, संख्येवर आणि एकूणच जीवनशैलीवर करण्यात येईल, तितकेच अधिक या प्रजातीच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात करता येईल.