गांधीनगर : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Radhika Wedding) यांच्या लग्नापूर्वी आयोजित केलेला प्री-वेडिंग सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी रिहानाचा डान्स चर्चेत असतानाच आता शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान 'जय श्री राम' म्हणत प्री-वेडिंगला उपस्थित असलेल्या लोकांना शुभेच्छा देताना ऐकू येतो.
कार्यक्रमच्या ठिकाणी उपस्थित लोकांनी जल्लोष करत शाहरुख खानच्या अभिवादनाला प्रतिसाद दिला असला तरी सोशल मीडियावर कट्टरपंथींना हा जल्लोष आवडला नाही. शाहरुख खानने जय श्री राम म्हटल्यामुळे कट्टरपंथी त्याच्याविषयी सोशल मिडियावर अपशब्द बोलत आहेत.
शाहरुख खान जय श्री राम म्हणतानाचा व्हिडिओ मानव मंगलानी यांनी रविवारी, दि. ३ मार्च २०२४ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला होता. व्हिडिओच्या सुरुवातीला शाहरुख खान स्टेजवर येताच त्याने सर्वांना जय श्री राम म्हटले. शाहरुख खानने 'जय श्री राम' म्हटल्यावर तिथे बसलेल्या लोकांनीही आवाज करून त्याला प्रोत्साहन दिले.
शाहरुख खानने आपल्या संबोधनात अंबानी कुटुंबातील महिलांना माता लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती ही उपमा देऊन संबोधित केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कट्टरपंथींनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत आहेत तर अनेक लोक शाहरुख खानला शिवीगाळ करताना दिसत आहेत.
सद्दाम नावाच्या या सोशल मिडीया वापरकर्त्याने शाहरुख खानवर जय श्री राम बोलण्यासाठी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. असाच आरोप शाहनूर ने सुद्धा केला. त्याने शाहरुख खानला दलालाची उपमा दिली. त्यासोबतच लिव्ह डाय नावाच्या सोशल मिडिया वापरकर्त्याने शाहरख खान आणि त्याच्या परिवाराविषयी अपशब्द वापरले.
शाहरुख खानने जय श्री राम म्हणत आपला दर्जा दाखवला आहे, असे मत नादिर रंगरेझ यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावर अनेक धर्मांध शाहरुख खानला शिव्या देत असले तरी नेटिझन्सही त्याचे समर्थन करत आहेत. तर काही कट्टरपंथी शाहरुख खानविषयी गरळ ओकत आहेत.