संघर्ष आणि न्यायशीलतेची ‘जयश्री’

31 Mar 2024 21:08:08
adv.
 
बारावीत अनुत्तीर्ण होऊनही, नंतर ‘एलएलबी’च्या शेवटच्या वर्षाला प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या, वैयक्तिक संघर्षातून सावरून, इतरांच्या न्यायासाठी झटणार्‍या, अ‍ॅड. जयश्री देवेंद्र यादव यांच्याविषयी...
 
अॅड. जयश्री देवेंद्र यादव यांचा जन्म मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामधील कॉर्टर्समध्ये झाला. आजी आणि आजोबा दोघेही तुरुंग अधिकारी असल्यामुळे साहजिकच आईचे माहेर आर्थर रोड जेलचे कॉर्टर्सच! जयश्री यांचे बालपण लालबाग-परळमध्ये गेले. जयश्रींची आई शिक्षिका तर वडील देवेंद्र यादव हे न्यायालयात नोकरदार. जयश्रींच्या जन्मानंतर वडिलांनी न्यायालयातील नोकरी सोडून, स्वतःच वकिली क्षेत्रात येण्याचे ठरवले.
 
जयश्रींचे संपूर्ण शालेय शिक्षण काळाचौकीतील अभ्युदय एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले. ज्या शाळेत जयश्री शिकत होत्या, त्याच शाळेत त्यांच्या आईदेखील शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे शिक्षिकेची मुलगी असल्याने कायमच आपली वागणूक आणि अभ्यासातील हुशारी टिकवण्यासाठी जयश्री कायम मेहनत करत होत्या. या सगळ्यात सहावीत असताना, काही कारणास्तव त्यांना भांडूपला राहायला जावे लागले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षांपासून शिक्षणाच्या ओढीने त्या एकट्या भांडूप ते लालबाग हा प्रवास करू लागल्या. पुढील महाविद्यालयीन शिक्षण अकरावी आणि बारावी हे त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून पूर्ण केले. इंग्रजी भाषेशी त्यांचा परिचय अकरावीपासूनच झाला. एक नवा प्रवास त्यांनी नव्या भाषेसोबत सुरू केला. यामुळे सुरुवातीला भाषा शिकताना, त्यांना फार अडचणी आल्या.
 
इंग्रजी भाषेचा दुष्परिणाम होत, जयश्री बारावीत नापास झाल्या. आपली मुलगी नापास झाल्याचा धसका त्यांच्या आईने इतका घेतला की, त्यांनी आत्महत्येचे पाऊल देखील उचलले होते. मात्र, या सगळ्या भावनिक प्रसंगात जयश्रींचे वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपली मातृभाषा आपल्याला कधीच मान खाली घालू देणार नाही, हे वडिलांचे शब्द ऐकून, पुन्हा एकदा त्या जोमाने उभ्या राहिल्या. पण, इंग्रजीचा अडसर जात नव्हता आणि परिणामी, जयश्रींची बारावी पूर्ण होत नव्हती. अखेर जयश्री यांनी हताश होत, आई-वडिलांना त्यांच्याकडून हे प्रयत्न असफल होत असल्याची कबुली दिली. यादरम्यान त्यांनी वडिलांच्या सांगण्यावरून शॉर्ट हॅण्ड, टायपिंग आणि लायब्रेरियन असे कॉर्स केले. अखेर २०११ साली शेवटच्या प्रयत्नात जयश्री बारावी पास झाल्या.
 
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, जयश्रींनी आता कायद्याच्या शिक्षणाचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. जयश्रींनी दादरमधील अ‍ॅड. बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. २०१२ मध्ये सुरू झालेल्या, या लॉ कॉलेजच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी जयश्री होत्या. जयश्रींबद्दल कौतुकास्पद बाब म्हणजे, बारावीत कष्टाने पास झालेल्या त्यांनी ’एलएलबी’ची पाच वर्षं ’केटी’शिवाय यशस्वीरित्या पूर्ण केली. जयश्रींना कायदा आपलासा वाटू लागला, अगदी रोजच्या जीवनातले त्याचे महत्त्व त्यांना समजले आणि याचे फळ म्हणजे ’एलएलबी’च्या शेवटच्या वर्षाला जयश्री यांनी त्यांच्या महाविद्यालयात पहिला तर मुंबई विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला. जयश्रींना ’पब्लिक इंटरनेशनल लॉ’मध्ये सुवर्णपदक अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
 
’एलएलबी’नंतर ’एलएलएम’ त्यांनी ’क्रिमिनोलॉजी’मध्ये केले. आणि वडिलांच्याच लॉ फर्ममध्ये प्रॅक्टिस सुरू केली. जयश्री यांनी आपला मानसिक समतोल कुठेही ढासळणार नाही, याची काळजी घेत, प्रत्येक केस हाताळत राहिल्या.
दोन वर्षं वडिलांसोबत काम केल्यानंतर, जयश्री यांच्यावर २०२२ मध्ये दोन मोठे दुःखाचे डोंगर कोसळले. त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखातून त्या सावरत असतानाच, त्यांचा घटस्फोटदेखील त्याच काळात झाला. एकीकडे वडील जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे विखुरलेले वैवाहिक जीवन या दोन्हींना सावरत पुन्हा एकदा जयश्री आपल्या पायवर उभ्या राहिल्या. दोन वर्षं वडिलांसोबत फर्ममध्ये काम केलेल्याचा अनुभव गाठीशी बांधत, त्यांनी नव्याने सुरुवात केली.
 
जेमतेम दोन वर्षांचा लॉच्या प्रॅक्टिसचा अनुभव असूनसुद्धा जयश्री जिद्दीने आणि नव्या जोमाने कार्यरत झाल्या. वडिलांच्या सर्व केसेस आपल्या हातात घेत, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांनी स्वतःला कामाशी समर्पित केले. वडिलांच्या जाण्यानंतर त्यांची मुलगी आपल्याला न्याय देऊ शकेल का? या प्रश्नांना तसूभरही जागा न देत, जयश्री आपल्या पायावर भक्कम उभ्या आहेत. आजही लोकांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी, त्या झटत आहेत. वैयक्तिक जीवनात त्यांचे लग्न तुटल्यानंतर जयश्री यांच्या एक बाब समजली, ती म्हणजे स्त्रियांच्या बाजूने बरेच कायदे आहेत; पण पुरुषांच्या बाजूचे कायदे गांभीर्याने घेतले जात नाहीत.
 
मग त्यांनी पुरुषांसाठीच्या कायद्याचा अभ्यास केला. अनेक खोट्या केसमध्ये अडकलेल्या पुरुषांच्या मदतीला धावून जात, त्या अनेक पुरुषांची कायदेशीररित्या मदत करत आहेत. जीवनात कितीही खडतर प्रसंग आले, तरी आपली जबाबदारी इतर गोष्टींपेक्षा फार मोठी आहे, याची जाणीव ठेवत, प्रवास थांबू न देण्याची जिद्द नक्कीच जयश्रींकडून शिकण्यासारखी आहे. अ‍ॅड. जयश्री देवेंद्र यादव यांना पुढच्या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0