संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

30 Mar 2024 14:49:28
Sanjay Nirupam mets CM Shinde


मुंबई : 
  उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे संतप्त झालेले काँग्रेस नेते संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे कळते. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली. अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केल्याचे कळते.
 
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, काल बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा आमच्या पक्षात प्रवेश झाला. पण त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संजय निरुपम हे काँग्रेसवर खूपच नाराज आहेत, त्यांनी सौम्य भाषेत काँग्रेसची सर्व उतरवली आहे. त्यामुळे मला वाटते की, ते येत्या दोन-तीन दिवसांत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील. जर ते आमच्याकडे आले, तर त्यांचे आम्ही स्वागत करू.


हे वाचलंत का? -  मोठी बातमी! विजय शिवतारेंची बारामती लोकसभेतून माघार

 
संजय निरुपम यांना शिवसेनेने कुठलीही ऑफर दिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते भेटले, पण अद्याप पक्ष प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पण ते जेव्हा येतील, तेव्हा याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.


उत्तर पश्चिममधून उमेदवारीची मागणी
 
- संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. येथील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मुलाला उबाठा गटाने तिकिट जाहीर केल्यामुळे ते मुलाला राजकारणात स्थीर करण्याच्या दृष्टीने पावले टाकताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना उमेदवारी दिल्यास पराभव अटळ आहे, ही बाब हेरून एकनाथ शिंदे यांनी उमेदवाराची शोधाशोध सुरू केली आहे.
 
- नुकताच अभिनेते गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना येथून उमेदवारी मिळेल, अशा चर्चा असतानाच निरुपम यांच्या भेटीमुळे वेगळ्या समीकरणांचे संकेत मिळत आहेत. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या निर्णायक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निरुपम यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी ३ लाखांहून अधिक मते घेतली होती. आता महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरल्यास निकाल वेगळा लागू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे.


Powered By Sangraha 9.0