जम्मू-काश्मीरमधील मार्तंड मंदिराचा होणार जीर्णोद्धार!

30 Mar 2024 21:29:40
Jammu and Kashmir Martand temple


नवी दिल्ली :
   जम्मू-काश्मीरमधील ८व्या शतकातील प्राचीन मार्तंड सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या संदर्भात सोमवारी (01 एप्रिल) जम्मू येथे उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर सरकारने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. मुस्लिम आक्रमक सिकंदर शाह मिरीच्या आदेशावरून हे मंदिर पाडण्यात आल्याचे सांगितले जाते.
 

हे वाचलंत का? - हंस राज हंस यांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी, भाजपची आठवी यादी जाहीर!


जम्मू आणि काश्मीर सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, "संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी अनंतनाग येथे एक बैठक बोलावली आहे ज्यात काश्मीरमधील प्राचीन मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि जिर्णोद्धार या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. ज्यात सम्राट ललितादित्य यांचा मार्तंड सूर्य मंदिर आवारात पुतळा बसविण्यावरही चर्चा होईल. ही बैठक 1 एप्रिल रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास प्रधान सचिवांच्या कार्यालयातील सचिवालयात होणार आहे.

आठव्या शतकातील मार्तंड मंदिर हे भारतातील सूर्यमंदिरांपैकी सर्वात जुने मंदिर आहे. ते भारताच्या अमूल्य प्राचीन आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित स्मारक आहे. हे मंदिर हिंदू राजा ललितादित्य यांनी बांधले होते. ओडिशातील कोणार्क आणि गुजरातमधील मोढेरा प्रमाणे, काश्मीरचे मार्तंड सूर्य मंदिर देखील भगवान सूर्याला समर्पित भव्य हिंदू मंदिरांपैकी एक आहे.


Powered By Sangraha 9.0