आभाळस्पर्शी गोरखगड

29 Mar 2024 23:02:11
Gorakhgad

एका उत्तुंग सुळक्यावर बांधलेला लिंगाणा किल्ला. त्याचं पठडीतला आणि ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात बसलेला उत्तुंग गिरीदुर्ग म्हणजे गोरखगड! लिंगाण्याप्रमाणेच याची बांधणी एका बेलाग सुळक्यावर केलेली. गोरखगडाला मच्छिंद्रगड नावाचा जोडदुर्ग असून त्यावर किल्ल्याची अथवा दुर्गस्थापत्याची कोणतीही निशाणी नसल्याने गिर्यारोहकांसाठी तो मच्छिंद्र सुळकाच आहे.

यथ्याच्या देहरी गावातून पाहिल्यावर एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे दिसणारे गोरखगड व मच्छिंद्रगड हा एक अद्भुत नजारा आहे. देहरीतून साधारणदीड तासांच्या खड्या चढाईने आपण गोरखगडाच्या दरवाजात पोहोचतो. येथे पोहोचण्यासाठी गोरखगडाच्या उभ्या सुळक्यावर अत्यंत कौशल्याने खोदलेल्या आणि खाली दिसणार्‍या खोल खाईला खेटून जाणार्‍या पायर्‍या हा थरारक मार्ग मात्र काळजाचा ठाव घेणारा आहे. गोरखगड मुळातच एका सुळक्यावर बांधलेला असल्याने, याला कोणत्याही प्रकारचा तटबंदीयुक्त दरवाजा नाही. तसेच चारही बाजूंनी कातरलेले कडे असल्याने कुठेही संरक्षक तटबंदीची आवश्यकता भासलेली नाही. त्यामुळे पुरेश्या सपाटीअभावीच गोरखगडाचा दरवाजा एका नैसर्गिक कातळात एक बोगदा तयार करून करण्यात आला आहे.
 
गोरखगडाचा ‘युएसपी’ म्हणजे त्याची प्रशस्त गुहा आणि त्यातला देहभान हरपून टाकणारा आणि आयुष्यभराची शिदोरी म्हणता येईल, अशा आठवणी देणारा मुक्काम, गुहेतून समोर दिसणारे आहुपे, नाणेघाट, हरिश्चंद्राचे कडे हे तर दृश्य मोहवून टाकणारं... गुहेच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. या गुहेच्या वर गोरखगडाचा सर्वोच्चमाथा असून तो गाठायलासुद्धा खोदीव पायर्‍यांचा थरार अनुभवत आपण माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर गोरखनाथ मंदिर असून इथून समोरचा सिद्धगड, आहुपे घाट, माहुली, माथेरान इत्यादी विस्तीर्ण नजारा बघणे हा एक नितांत अविस्मरणीय अनुभव. गोरखगडाची पाठराखण करणारे आहुपे घाटाचे बुलंद कडे हे मात्र सार्‍या कष्टांचं सार्थक करतात. गोरखगडाची निर्मिती पुरातन अशा आहुपे घाटाचा संरक्षक म्हणून केली गेली. त्यामुळे आज जरी गोरखगड आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांसाठी एक धार्मिक स्थळ असला, तरी गिर्यारोहण हाच धर्म मानणार्‍या सह्याद्रीच्या निस्सीम भक्तांसाठी हे मात्र एक प्रकारचा सह्यतीर्थक्षेत्रच आहे.

कसं जायचं?

 
पुण्याहून कर्जत-म्हसा-नारिवली-देहरी किंवा पुणे -माळशेज घाट-धसई-देहरी असा गोरखगडला जाण्यासाठी मार्ग आहे. मुंबईहून कल्याण-मुरबाड- म्हसा-देहरी किंवा कर्जत-म्हसामार्गे पायथ्याच्या देहरी या गावात पोहोचावे. दोन्हीकडून प्रवासाचा वेळ साधारणपणे तीन ते चार तासांचा आहे.
 
जेवणाची व मुक्कामाची सोय
 
गडावरील प्रशस्त गुहेत मुक्काम करता येतो. तसेच, गुहेसमोरील टाक्यात पाणी उपलब्ध होते. गडावर मुक्काम केल्यास जेवणाची सोय आपल्यालाच करावी लागते. देहरी गावात जेवणाची सोय होते.



ओंकार ओक


Powered By Sangraha 9.0