रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट! बॉम्बसाठी साहित्य पुरवणारा 'मुजम्मिल' NIA च्या ताब्यात

29 Mar 2024 11:58:16
 Muzammil Sharif
 
बंगळुरू : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक केल्याचा दावा एनआयएने केला आहे. ३ राज्यांमध्ये १८ ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली. मुजम्मिल शरीफ असे अटक आरोपीचे नाव आहे. मुजम्मिलने स्फोटासाठी इतर आरोपींना संसाधने पुरवली होती. एनआयए सध्या या प्रकरणी मुसाव्वीर शाजेब हुसेन आणि अब्दुल मतीन ताहा यांचा शोध घेत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने बुधवारी, दि. २७ मार्च २०२४ या कारवाईची पुष्टी केली आहे.
 
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी मुजम्मिल शरीफ हा रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटात साथीदाराची भूमिका बजावत होता. एनआयएने सुरुवातीला स्फोटातील मुख्य आरोपी मुसाव्वीर शाजेब हुसेनची ओळख पटवली होती. मुसाव्वीरवर स्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे. एनआयएने तपासात दुसरा आरोपी म्हणून अब्दुल मतीन ताहा याची ओळख पटवली. स्फोटाव्यतिरिक्त ताहा रामेश्वर इतर अनेक दहशतवादी घटनांमध्येही सहभागी होता.
 
हे वाचलंत का? - राऊत खोटं का बोलतायं? प्रकाश आंबेडकरांनी झापलं!
 
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार मुसव्वीर हुसेन आणि अब्दुल मतीन फरार आहेत. एनआयएचा तपास जसजसा पुढे जात होता, तसतसे या प्रकरणात मुझम्मील हुसेनचेही नाव समोर आले होते. हा स्फोट घडवून आणण्यासाठी मुजम्मिलने मुसाव्वीर आणि मतीन यांना मदत केल्याचे उघड झाले आहे. त्याने स्फोटके तयार करण्यासाठी संसाधनांची व्यवस्था केली. मुजम्मिलला अटक करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकाच वेळी ३ राज्यांत एकूण १८ ठिकाणी छापे टाकले.
 
छापेमारीत मुजम्मिल, अब्दुल मतीन आणि मुसाविर हुसैन यांच्या घरांची आणि दुकानांचीही झडती घेण्यात आली. अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांची तपासणी सुरू आहे. या छाप्यात मुजम्मील हुसेन याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे. मुझम्मीलच्या चौकशीनंतर रामेश्वरम कैफ बॉम्बस्फोटातील अनेक तथ्य समोर येऊ शकतात. ही अटक एनआयएसाठी मोठे यश मानले जात आहे. दि. १ मार्च २०२४ रोजी बेंगळुरूच्या आयटीपीएल रोडवर असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या घटनेत कॅफे कर्मचारी आणि काही ग्राहक जखमी झाले. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0