जाहिरातीच्या डिजिटल बोर्डातून पालिका कमावणार वर्षाला ३० कोटी!

    29-Mar-2024
Total Views |
BMC Digital Advertisement


मुंबई : 
 उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पदपथ रस्ते दुभाजक, रस्त्यांच्या दुतर्फा डिजिटल बोर्ड बसवण्यास पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षांला ३० कोटी याप्रमाणे ९ वर्षांत ३३८ कोटी १७ लाख ४८ हजारांचा महसूल जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिकेच्या मालकीच्या पदपथावर रस्त्याच्या बाजुला आणि रस्ता दुभाजकावर डिजिटल फलक उभारले जाणार आहेत. महापालिकेने जाहिरातींच्या मार्गदर्शक धोरणानुसार या डिजिटल फलकांची उभारी करण्यासाठी निविदा मागवली होती. ज्यात कंपनीला २०० डिजिटल फलक पाठोपाठ अर्थात ४०० डिजिटल जाहिरात बोर्डची व्यवस्था करावी, अशी अट घालण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील काही ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी हे जाहिरात फलक लावले जाणार आहे. यासाठी बिझलिस्ट ऍडव्हर टाईजिंग एलएलपी या कंपनीची निवड झाली असून डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, मेंटेन आणि ट्रान्सफर या तत्वावर हे ४०० डिजिटल जाहिरात फलक लावले जाणार आहे.


मुंबई शहरात सध्या इमारत बांधकामे, मेट्रो, भुयारी मेट्रो, वाहतूक पूल अशी विविध प्रकारची सहा हजारांहून अधिक विकासाची कामे प्रगती पथावर आहेत. त्यानुसार जाहिरात क्षेत्रात सध्या प्रचंड वाढ होत आहे. या जाहिरातींचे उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या जागेवर जाहिरात फलकांना परवानगी दिल्यास महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला नऊ वर्षांकरता जाहिरातींचे हक्क प्रदान केलेले आहेत. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जाहिरातीचे फलक हे महापालिकेला हस्तांतरीत केले जातील. मात्र, त्यावर कंपनीकडून कोणताही दावा केला जाणार नाही, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 

या ठिकाणी झळकणार डिजिटल फलक

हाजी अली, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, दादर, परळ, वांद्रे कार्टर रोड, वांद्रे बँड स्टँड, सिद्धिविनायक रोड, लिकींग रोड, एस. व्ही. रोड., अंधेरी, मालाड पश्चिम, मालाड न्यू लिंक रोड, एम. जी. रोड शिव माथुरादास, अंधेरी-कुर्ला रोड, चेंबुर, वर्सोवा, जुहू, खार, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पवई, गोरेगाव, वडाळा, माहिम, रेक्लेमेशन, लालबाग, शीव, जोगेश्वरी, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, मरोळ, मुलुंड, ईस्टर्न फ्रि वे मार्ग.