अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स

    29-Mar-2024
Total Views |
Amol Kirtikar ed Summons


मुंबई : 
 उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तथा उबाठा गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. ८ एप्रिल रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत मजुरांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. ५२ कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.


हे वाचलंत का? - काँग्रेस हा समंजस पक्ष, आता दिल्लीत चर्चा होणार नाही!


यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करीत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करीत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात ६ कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता.
 
काँग्रेसकडून कीर्तिकरांच्या उमेदवारीला विरोध!

शिवसेना (ठाकरे गट)कडून मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात मविआकडून जागावाटप करण्यात आले असून अद्याप काही जागांवर एकमत होणं अजून बाकी आहे. दरम्यान, कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षाकडून जोरदार विरोध करत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर खिचडी घोटाळ्यातील आरोपीला आमच्या डोक्यावर थोपविले जात आहे, असे सांगत खिचडी चोराला आपण कधीच समर्थन करणार नाही अशी रोखठोक भूमिका जाहीर केली.