ग्रेसांच्या दुर्बोध कवितेमागचं नेमकं गमक काय?

    26-Mar-2024   
Total Views |

gress
मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही, असं म्हणणारा कवी आपल्याला भुरळ घालेल त्यात नवल ते काय? दुर्बोध वाटल्या तरी का वाचाव्याश्या वाटतात ग्रेसांच्या कविता? ग्रेसांच्या काही पुस्तकांना अर्पणपत्रिका नाही हे कधी लक्षात आलेय? ग्रेस त्यांच्या लेखणीसारखेच गूढ. आणि तसेच तेवढेच ग्रेसफुल सुद्धा. मात्र हे अर्पण पत्रिकेचं पान कोरं ठेवताना, त्याआधीच्या पानावर ते स्वतःबद्दल काही सांगतात. चांद्रमावधीच्या प्रदेशात या त्यांच्या काव्यसंग्रहाचे अर्पणपत्रिकेचं पान चक्क कोरं आहे. त्याआधीच्या पानावर ते लिहितात, '...when you have finished with others, that is my time'
 
दुर्धर आजाराशी लढताना २०१२ साली आजच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वतःला दुःखाचा वेदनेचा महाकवी म्हणवून घ्यायचं आणि तीच आपली दुःख चंदनासारखी उगाळायची. त्यांना शब्दरूप द्यायचं. आणि या शब्दांतून त्यांनी नेहमीच स्वतःला मांडलं आहे. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. त्यांची एक आई भर पावसाळ्या रात्री घर सोडून दुसऱ्या पुरुषाचा हात धरून निघून गेली. तेव्हा एका खिडकीतून त्यांचे वडील आईला जाताना पाहत होते. ते लिहितात, 'माझी आई मत्त वासना..' पण हे वाक्य, ही कविता हिडीस वाटत नाही. या प्रसंगावरही त्यांची एक अत्यंत गाजलेली कविता आहे. ती गेली तेव्हा.. पण या कवितेतून त्यांना आईचा राग आल्याचे जराही जाणवत नाही. आतल्या आईपणापेक्षा तिच्या बाईपणाला ते जास्त महत्व देतात. तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करतात. म्हणून या कवींबद्दल मला जास्त आदर आहे.
एका कवितेत ते म्हणतात,
 
तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी
 
पोटात तीव्र भूक असताना आईच्या चेहऱ्यावरचा थकवा पहिला आहे तुम्ही? काय होत असेल या निष्पाप डोळ्यांचं? मग ही पदराची सोबतही त्यांना कधीतरी नको वाटते. ओझं नको. पण हा एकटेपणा तरी सहन होतो का त्यांना? ते म्हणतात,
 
कधी क्षितीजवरून मीच पसराव्या हाका
आणीन उलट्या हाकेने माझा शब्द व्हावा मुका...
 
वेळ कधी अशीही येते, ज्यासाठी केला होता अट्टाहास, तोच अंतरातून उमटून आणलेला आपलाच शब्द आपल्याला मुका करावा वाटतो. पण त्यांना त्यांच्या भावनांचे गमक कळले आहे. हे स्वतःला स्वीकारणं किती सोप्प असत हे ते नेहमी सांगतात. मोहर नावाची त्यांची कविता वाचली तेव्हा मला वाटलं इतकी स्पष्ट आज्ञा स्वतःच्या स्वीकृतीबद्दल ते करतात आपण का त्यांना समजून घेऊ शकत नाहीत.. त्यांच्या या कवितेतील काही ओली अशा आहेत,
 
पाऊस पडला मोहर झाडाला
उचला ग कोणी,
उधळून द्या ग यौवन सगळे
माझ्या मायाबहिणी
ढगांत लपले मनात हसले ऊन सोनीयाचे
झरेल तोवर मालवून टाका पाय चंदनाचे ...
 
त्यांच्या कविता दुर्बोध आहेत असे आरोप वारंवार त्यांच्यावर झाले. त्यानिमित्ताने त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय. 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या ललित लेखात ते म्हणतात, " माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही. माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे."
 
त्यांच्या सर्व कविता समजाव्यात इतकं अनुभवसंपन्न आयुष्य हवं असं वाटत म्हणून हा सारा खटाटोप.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.