केजरीवालांचा ईडी कोठडीतून राज्यकारभार!, भाजपकडून राजीनाम्याची मागणी
26-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी ईडीकडून अटक झाल्यानंतर आता थेट तुरुंगातून राज्याचा कारभार चालविण्यात येत आहे. दरम्यान, दि. २१ मार्च २०२४ रोजी रात्री केजरीवालांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री केजरीवालांनी ईडीच्या कोठडीतून संबंधित मंत्र्यांना आदेश पाठविले आहेत.
दरम्यान, केजरीवालांच्या या आदेशाविरोधात एफआयआर नोंदविण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मंत्री आतिशी यांना पाठविलेल्या आदेशामुळे आता पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आता अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'अरविंद केजरीवाल राजीनामा द्या', 'राजीनामा द्या, केजरीवाल राजीनामा द्या', 'प्रत्येक गल्लीबोळात गोंगाट आहे, केजरीवाल चोर आहे' अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून निदर्शने करत दिल्या जात आहेत.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, आता आरोग्य विभागासाठी मुख्यमंत्र्यांचा आदेश आला आहे. ते म्हणाले, मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधांचा तुटवडा भासू नये, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ही माहिती दिली आहे. याआधी सीएम केजरीवाल यांनी दिल्लीतील उष्णता पाहता पाण्याच्या टँकरची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
खरं तर, दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात ईडीने अटक केल्यानंतर सीएम केजरीवाल म्हणाले होते की ते जेलमधूनच सरकार चालवतील. यानंतर त्यांनी दि. २४ मार्च २०२४ रोजी पहिला आदेश जारी केला. ही सूचना जल मंत्रालयाशी संबंधित होती. त्यांनंतर आता दि. २६ मार्च रोजी दुसरा निर्देश जारी करण्यात आला असून मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. या निर्णयांमुळे आता भाजप आक्रमक झाला असून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.