इस्लामिक दहशतवादाचे बळी

26 Mar 2024 22:12:13
Moscow attack

गायन, वाद्य यंत्रांचा आवाज अन् यावर थिरकणारा सहा हजार लोकांचा प्रेक्षक वर्ग. हे दृश्य होतं, मॉस्कोपासून अवघ्या २० किमी दूर असलेल्या क्रोकस सिटी हॉलचं. सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानक क्रोकस सिटी हॉलमध्ये आगीचा आगडोंब उसळला. या आगीपासून वाचण्यासाठी हॉलमध्ये बसलेले लोकं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचवेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला जातो. आपला जीव वाचवण्यासाठी लोकं मिळेल तो आसरा घेण्याचा प्रयत्न करतात. पण, चार हल्लेखोरांच्या बंदुकीपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण. या हल्लेखोरांच्या गोळीबारात आतापर्यंत १४१ लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

एकीकडे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन पूर्णपणे बेचिराख झाला असताना रशियामध्ये मात्र या युद्धाचा तितकासा परिणाम सामान्य जनतेवर झाला नाही. काही दिवसांपूर्वीच रशियामध्ये शांततापूर्ण परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका पार पडल्या. त्याला अवघे काही दिवस उलटत नाही तोवर एका बँडच्या कार्यक्रमासाठी कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. पण, मॉस्कोमध्ये झालेल्या या हल्ल्याने रशियाच्या सुरक्षाव्यवस्थेवर खासकरून पुतीन यांच्या ’स्ट्राँग मॅन’ प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, युद्ध सुरू असतानाही थेट रशियावर हल्ला करण्याचे युक्रेन टाळत आहे. अशा परिस्थितीत ‘इस्लामिक स्टेट’सारख्या दहशतवादी संघटनेने एवढा मोठा दहशतवादी हल्ला करून रशियाला आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आव्हान दिले, यामागे कारण काय? कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुतीन यांनी देशवासीयांना संबोधित केले. आपल्या वक्तव्यात त्यांनी हा दहशतवादी हल्ला युक्रेनने केल्याचा संशय व्यक्त केला. त्यासोबतच हल्लेखोरांचा संबंध हा युक्रेनसोबत आहे, असा आरोपदेखील रशियातील सुरक्षा यंत्रणांनी केला. पण, रशियाची गुप्तचर संस्था हा दावा करत असतानाचं ‘इस्लामिक स्टेट’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हा हल्ला आम्हीच केला आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी व्हिडिओ पुरावेदेखील सादर केले.

दुसरीकडे युक्रेनने रशियाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. अमेरिकेनेसुद्धा रशियाला अशाप्रकारचा हल्ला होऊ शकतो, अशी गुप्त माहिती आधीच दिली असल्याचा दावा केला. या सर्व गोष्टीमुळे युक्रेनचा या हल्ल्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नव्हता, हेच सिद्ध होते. पण, रशियाचे सरकार या हल्ल्यात युक्रेनचा सहभाग नव्हता, हे मान्य करायला तयार नाही. युक्रेनवर हल्ल्याचा आरोप करून पुतीन आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणा आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असेच दिसते.‘इस्लामिक स्टेट’ने हा हल्ला आम्हीच केला, असे सांगणारे व्हिडिओ पुरावे सादर केले आहेत. ‘इस्लामिक स्टेट’ने रशियामध्ये किंवा जगभरात रशियाशी संबंधित ठिकाणांवर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. ‘इस्लामिक स्टेट’नेच २०१४ मध्ये इजिप्तमध्ये रशियन विमानात झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. यासोबतच ‘इस्लामिक स्टेट’ने २०१७ मध्ये सेंट पीटर्सबर्ग मेट्रोमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात १५ लोकांचा मृत्यू झाला होता. जाणकारांच्या मते, ‘इस्लामिक स्टेट’ची रशियासोबतच्या शत्रुत्वाची अनेक कारणे आहेत.
 
रशियाने सीरियाच्या गृहयुद्धात बशर अल असद यांच्या राजवटीला पाठिंबा दिला. ‘इस्लामिक स्टेट’चं स्थापनेपासूनचं पहिलं लक्ष्य होतं, इराक आणि सीरियामध्ये आपली सत्ता स्थापन करणे. पण, रशियाच्या पाठिंब्यामुळे सीरियामध्ये बशर अल असद यांच्या राजवटीला उखडून फेकण्यात ‘इस्लामिक स्टेट’ला अपयश आले. ‘इस्लामिक स्टेट’ आज कमकुवत झाली असली तरी, ‘इस्लामिक स्टेट’ची खुरासन शाखा आजही मध्य आशियात आपला प्रभाव राखून आहे. रशियाचा मुस्लीमबहुल देशातील वाढत्या हस्तक्षेपामुळे रशिया आणि ‘इस्लामिक स्टेट’मध्ये संघर्ष सुरू आहे. त्यासोबतच या शत्रुत्वाला चेचन्या आणि अफगाणिस्तान युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे. हा हल्ला रशियासाठी मोठा धक्का असला तरी, यामध्ये रशियाचा विजय होईल, अशी आशा करुया.



Powered By Sangraha 9.0