पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पुणे येथे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी आपल्या पहील्या उमेदवाराची ( Sunil Tatkare Raigad ) घोषणा केली आहे. यावेळीच अजित पवार यांनी महायुतीच्या सर्व जागांच्या घोषणेसाठी निश्चित तारखेची माहीती दिली.
रायगड लोकसभा मतदार संघातुन अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणुन घोषणा केली आहे. सुनिल तटकरेंना रायगड मध्ये विजयी करण्यासाठी महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील असंही ते म्हणाले. सुनिल तटकरे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडुन उबाठा गटाचे अनंत गिते यांचे आव्हान असण्याची श्यक्यता आहे.
अजित पवार यांनी २८ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत महायुतीच्या सर्व जागांची घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. जागावटपात कोणतेही वाद नाहीत सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांना विश्वासात घेवुन निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे वेळ लागतो असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाला फक्त ३ जागा मिळणार असं माध्यमांमध्ये सांगितले जात होते. त्याही अफवा असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत याचा विचार जागावाटपात केला गेल्याचही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
बारामती आणि शिरुरच्या जागेच्या उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी उमेदवार कोण असणार यावर अजित पवारांनी पुर्णविराम लावला आहे. तुम्ही ज्या नावाचा विचार करत आहात ९९ % तेच नाव बारामतीतुन असणार आहे आणि उरलेला १ टक्का २८ तारखेला पुर्ण होईल. असंही ते म्हणाले आहेत त्यामुळे सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
शिरुर मध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतुन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शिरुरचा उमेदवार जाहीर करेन असंही अजित पवार म्हणाले त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे घड्याळ चिन्हावर महायुतिचे उमेदवार असतिल याची चुणुक अजित पवार यांनी दिली आहे.