उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात (Mahakala Mandir Fire) भस्म आरती दरम्यान लागली आग. मंदिरातील पुजाऱ्यांसह १४ जण भाजले. सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर सर्वांवर उपचार सुरु.
भोपाळ : मध्य प्रदेशचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरती सुरू असताना आग लागली. सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत मंदिरातील पुजाऱ्यांसह १४ जण भाजले गेले. आरतीवेळी उधळलेल्या गुलालामुळे आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. भाजलेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.
हे वाचलंत का? : १०० टक्के मतदानासाठी नवीन मतदारांना विहिंप जागरूक करणार! : मिलिंद परांडे
धुलिवंदनच्या निमित्ताने हजारो भाविक त्यावेळी मंदिरात उपस्थित होते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तेथील एका जखमी सेवकाने सांगितले की, आरती करत असलेले पुजारी संजीव यांच्यावर उधळलेला गुलाल पेटत्या दिव्याच्या संपर्कात आला. गुलाल केमिकलयुक्त असल्याकारणाने आग लागली असावी. गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी तेथे फ्लेक्स लावण्यात आले होते, तेही आगीच्या संपर्कात आले.
काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले १४ जण भाजले गेले. सदर प्रकरणी विशिष्ट समिती अंतर्गत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तीन दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले.