मोठी बातमी! राज्यात 'या' तारखांना मिळणार भरपगारी सुट्टी

    26-Mar-2024
Total Views |
Loksabha Election Voting maharashtra state



मुंबई :    राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक मंगळवार, दि. २६ मार्च रोजी जारी करण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. १९ एप्रिल,२६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे, २०२४ अशा पाच टप्प्यांत होणार आहे. त्यानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले सरकारी कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना; मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.


हे वाचलंत का? - पंजाबमध्ये आगामी लोकसभा स्वबळावर! अकाली दलासोबत युती नाही


ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.


...तर कारवाई होणार

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.