मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकी देशाची दिशा आणि स्थिती ठरवणार असल्याने या निवडणुकीत विश्व हिंदू परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे समोर येत आहे. "भविष्यातील जो भारत आपण बघू पाहतोय, त्यात आपला देश स्वाभिमानी होवो, संस्कारांमध्ये दृढ होवो, देशातील समाज शोषण मुक्त आणि समतायुक्त होवो, संपूर्ण जगात ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या मदतीसाठी नेहमी सिद्ध राहता येईल, यासाठी विहिंप प्रयत्न करणार आहे. विहिंपचे कार्यकर्ते नवीन मतदारांना हिंदू हिताची गोष्ट करणाऱ्या पक्षाच्या बाजूने १०० टक्के मतदान करण्यासाठी जागरूक करतील", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संगठन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले.
केशवसृष्टी, उत्तन येथे विहिंप कोकण प्रांतची दोन दिवसीय (२३-२४ मार्च) वार्षिक नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी उपस्थितांना संबोधताना त्यांनी कार्यकर्त्यांना परिषदेच्या धोरणांची ओळख करून देताना शोषणमुक्त आणि मूल्यांचे रक्षण करणारा समाज घडवायचा असल्याचे आवाहन केले.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विश्व हिंदू परिषदेची भूमिका मांडताना मिलिंद परांडे म्हणाले, "विहिंपची सर्वसामान्यतः हीच मान्यता राहिली आहे की, आपल्याला येणाऱ्या काळातील भारत हा स्वाभिमानी, सुसंस्कृत आणि हिंदू हितसंबंधांबद्दल बेलणारा भारत हवा आहे. हिंदू कधीच कोणाचे नुकसान करत नाहीत म्हणून हिंदू हिताबद्दल बोलल्याने इतरांचे नुकसान होणार नाही."
पुढे ते म्हणाले, "२०१९ मध्ये संसदेने संमत केलेल्या सीएए कायद्याचा उद्देश स्पष्ट आहे की ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन लोकांनाच नागरिकत्व दिले जाईल. यात काही लोक 'मुस्लिमांना नागरिकत्व गमवावे लागेल' अशा गैरसमजातून अफवा पसरवत आहेत. सीएए कायदा नागरिकत्व देणारा कायदा असून तो नागरिकत्व काढून घेणारा कायदा नाही."
यावेळी विहिंपचे कोकण प्रांत अध्यक्ष जोग सिंह, कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर, कोकण प्रांत सहमंत्री श्रीराज नायर, प्रांत सहमंत्री राजेंद्र पवार आदी मंडळी उपस्थित होती.