पत्राला पत्रानं उत्तर! प्रणिती शिंदेंवर राम सातपूतेंचं शरसंधान

25 Mar 2024 12:27:55

Ram Satpute Praniti Shinde 
 
सोलापूर : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजप नेते राम सातपूतेंना लिहिलेल्या पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर दिलेलं आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजपने राम सातपूतेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपूते अशी स्पर्धा रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपूतेंना एक पत्र लिहिले होते.
 
प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात राम सातपूते म्हणाले की, "मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय," असा टोला त्यांनी प्रणिती शिंदेंना लगावला.
 
 
 
"राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन," असा विश्वास राम सातपूतेंनी व्यक्त केला आहे.
 
 
 
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
 
"लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. तसेच सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते," असे म्हणत प्रणिती शिंदेंनी उमेदवारीसाठी राम सातपूतेंना शुभेच्छा दिल्या आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0