"१५ मिनिटांचे एक लाख अन् तासासाठी…”, अनुराग कश्यप आता भेटीसाठी आकारणार पैसे
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) सध्या त्यांच्या अनोख्या पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी जर का त्यांची भेट घ्यायची असेल तर पैसे मोजावे लागणार असे म्हणत भेटण्यासाठीचे दरपत्रक नव्या होतकरू कलाकारांसाठी (Anurag Kashyap) ठरवले आहे. मला माझा मौल्यवान वेळ वाया घालवायचा नाही, त्यामुळे ज्या कुणाला मला भेटायचं असेल त्यांना आता पैसे मोजावे लागतील, असे अनुराग यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनुराग म्हणतात, “नवख्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात मी आतापर्यंत माझा खूप वेळ वाया घालवला, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता मला अनोळखी लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवायचा नाही. ज्यांना वाटतं की ते खूप क्रिएटिव्ह आणि प्रतिभावान आहेत, त्यांना मला भेटायचं असेल तर त्यासाठी मी दर ठरवले आहेत. जर एखाद्याला मला १०-१५ मिनिटांसाठी भेटायचं असेल तर मी एक लाख, अर्ध्या तासासाठी दोन लाख आणि एका तासासाठी पाच लाख रुपये घेईन. हेच दर आहेत. मला लोकांना भेटून वेळ वाया घालवायचा कंटाळा आला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्या भेटीसाठी पैसे देऊ शकता, तरंच मला फोन करा नाहीतर दूर राहा. आणि हो पैसे आधी द्यायचे आहेत.”
पुढे ते असं देखील म्हणाले आहेत की, “मला मेसेज, डीएम किंवा कॉल करू नका. तुम्ही पैसे द्या मी तुम्हाला वेळ देईन. मी दानधर्म करायला बसलेलो नाही आणि मी शॉर्टकट शोधणाऱ्या लोकांना कंटाळलो आहे,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी नवोदित कलाकारांना सुनावले आहे. त्यामुळे आता खरंच त्यांना भेटणारे लोकं पैसे मोजणार की पुढे काय होणार यासाठी अनुराग यांच्या नव्या पोस्टची वाट पाहावी लागेल.