अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी भारतातच नव्हे, तर परदेशातही राममय वातावरण तयार झाले होते. यापूर्वी परदेशातील हिंदू संघटित व्हायला, एकत्र यायला कुचरायचे. मात्र, या सोहळ्यानंतर ते एक विचाराने हिंदू धर्मासाठी संघटित होऊ लागले आहेत. त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रदेशातील हिंदूंमध्ये, तिथल्या वातावरणात नेमके काय बदल झाले? काय परिणाम झाले? याबाबत हिंदू स्वयंसेवक संघाचे विश्व विभाग संयोजक आणि ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’चे सल्लागार सौमित्र गोखले यांच्याशी दै. ’मुंबई तरुण भारत’चे वेब उपसंपादक ओंकार मुळ्ये यांनी साधलेला विशेष संवाद...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते हिंदू स्वयंसेवक संघाचे ‘ग्लोबल को-ऑर्डिनेटर’ हा प्रवास आपल्यासाठी कसा होता?
कॅनडामध्ये शिकायला गेलो असता, तेव्हाच संघ प्रचारक बनण्याबाबत निश्चित केलं होतं. १९९५ मध्ये भारतात आल्यावर संघ प्रचारक झालो. मनात तर होतंच की, मायदेशी येऊन संघाचं काम करायचं. कॅरेबियन देशात संघाचे कार्य सुरु झाले होते. मात्र, प्रचाराची आवश्यकता भासत होती. तेव्हा कॅरेबियन देशात पहिल्यांदा प्रचारक म्हणून गेलो. तिथून पुढे हिंदू स्वयंसेवक संघाचे काम सुरू झाले. हळूहळू आवश्यकतेनुसार, पुढे अमेरिका झोनचेही काम सुरु झाले. २०११ मध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची विश्व विभाग संयोजक म्हणून जबाबदारी आली. कॅरेबियन देशात संघकार्य सुरू झाले, तेव्हा तिथल्या लोकांना याबाबत अनेक प्रश्न होते. मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजतील, अशा स्वरुपात त्यांना समजावून संघाचे काम वाढत गेलं. त्यामुळे त्या ठिकाणी राहणे, हे माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी होतं. संघाच्या शाश्वत गोष्टींमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. जगभरात संघाचे कामही वाढत आहे. हे करताना स्वतःमध्येही बदल होतो, शिकायला मिळतं याचा एक आनंद आहे.
दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यादरम्यान संपूर्ण भारतातच नव्हे, तर परदेशातील हिंदू बांधवही राममय वातावरणाने न्हाऊन निघाले होते. तेव्हा, जगभरातील हिंदूंच्या उत्साहाबाबत काय सांगाल?
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान भारताप्रमाणेच इतर राष्ट्रांमध्येही चांगलं वातावरण होतं. संघाचे स्वयंसेवक संबंधित संस्था, भाषेच्या आधारावर चालणार्या संस्था, मंदिरे या सर्वांशीच संपर्कात असतात. अशांना संघ हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मात्र पूर्वीपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. परदेशातील बहुतांश मंदिरांमध्ये त्यादिवशी अनेक कार्यक्रम संपन्न झाले. जवळपास ८० देशांमध्ये कार्यक्रम झाले. अनेक देशांत तर आपण ठरवलं, त्यापलीकडे कार्यक्रम हिंदूंनी केले. काही देशांमध्ये कार रॅली झाल्या, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम झाले. ऑकलंड (न्यूझीलंड) मध्ये तिथल्या सर्व मंदिरांनी एकत्र येऊन, एक स्टेडियमचं बुक केलं होतं. जवळपास आठ हजार लोकांचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. उत्साहाचं, आनंदाचं वातावरण जगभरात होतं. बुरुंडी (पूर्व आफ्रिका) आणि नेदरलॅण्ड या दोन देशात श्रीराम मंदिराच्या निमित्ताने पोस्टल स्टॅम्प प्रकाशित झाला. आपल्या अनेक बिंदूंच्या प्रयत्नांनी अत्यंत चांगलं वातावरण यावेळी तयार झालं होतं.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आणखीन कोणत्या पातळीवर परिणाम भारताबाहेर दिसून आले?
जी मंडळी सहजपणे एकत्रही येत नव्हती, एकमेकांमध्ये त्यांचं भेटणं व्हायचं नाही, त्यांच्याबाबतही रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर चित्र बदललं. त्यानंतर समाजात अनुकूलतेचं वातावरण आहे की, आपण कुठलाही कार्यक्रम घेतला, तर त्याला आता चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे पुढे हे असेच चालू राहावे, यासाठी सविस्तर योजनाही आखली जाईल. ’एखादी लाट आली आणि ओसरली’ असे न होता, त्याचा एक प्रवाह बनावा, त्यासाठी सर्व ठिकाणी योजना सुरू आहेत. ’हिंदू अवेअरनेस’ नावाचा एक कार्यक्रम केला होता. प्रत्येक देशाने आपापल्यापरीने विचार करून, हिंदूंना संघटित करून तो कार्यक्रम यशस्वी केला.
युएईमधील अबुधाबीतही भव्य हिंदू मंदिराचा लोकार्पण सोहळा गेल्या महिन्यात संपन्न झाला. अरब राष्ट्रांमध्येही भव्य हिंदू मंदिरं सध्या उभी राहताना दिसतायत. याकडे कसे बघता?
मलेशिया, इंडोनेशियासारख्या मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्ये हिंदूंची मंदिरे आहेतच. मात्र, युएईसारख्या अरब राष्ट्रामध्ये भव्य हिंदू मंदिर निर्माण होणं, ही चांगली बातमी आहे. त्यात ओमानमध्ये १०० वर्षं जुनी मंदिरे आहेत. बहारीन, दुबईसह भारत-अरब राष्ट्रांमध्ये जुने व्यापार संबंध आहेत. त्यामुळे आपल्या लोकांचे त्या ठिकाणी जाणं, तिथे राहणं, मंदिरे असणं यात काही नावीन्य नाही. परंतु, नंतर जेव्हा तेलाचं महत्त्वं वाढलं आणि त्यानंतर जी श्रीमंती तिथे आली, त्यामुळे एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. कट्टरपणा किंवा अधिक निर्बंध त्या ठिकाणी निर्माण झाले, असं म्हणायला हरकत नाही. मात्र, आता पुन्हा एकदा उदारमतवादी वातावरण तिथे तयार होताना दिसतंय त्या ठिकाणचे राज्यकर्ते याबाबत विचार करत आहेत. साधारण ५० ते ६० लाख हिंदू अरब राष्ट्रांत राहतात. मात्र, मंदिरांची संख्या मोजकी असल्याने, त्या हिंदूंना आपल्या घरात किंवा तेथील भारतीय शाळांमध्येच कार्यक्रम करावे लागतात. म्हणून गेल्या काही वर्षांत ‘बीएपीएस’चे संन्यासी आणि साधूंच्या प्रयत्नांतून एक शिखरबद्ध मंदिर अरब राष्ट्रात होणं, ही पहिलीच घटना आहे. या मंदिरामुळे तिथल्या सर्व हिंदूंना आनंद झाला आहे. मंदिर परिसरात अन्य विविध मंदिरांचीही रचना करण्यात आली आहे. त्यामुळे येथील हिंदूंमध्ये स्वाभाविकच आनंदाची लाट आहे की, पहिल्यांदा आपण अरब राष्ट्रात मंदिराला अधिकृतपणे देणगी देऊ शकतो. या मंदिरापासून प्रेरणा घेऊन, इतर राष्ट्रांमध्येही मंदिरे सुरू होतील, अशी शक्यता आहे.
संघ शताब्दी वर्षानिमित्त हिंदू स्वयंसेवक संघाची तयारी कशी सुरू आहे?
संघ शताब्दी वर्षानिमित्त वेगळी तयारी सुरु आहे असे नाही; कारण भारताबाहेर संघाचे काम स्वतंत्रपणे चालतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे निश्चितच प्रेरणेचं स्थान आहे. त्यामुळे शताब्दी वर्षात संघाची माहिती देण्यासंदर्भातील ’हिंदू धर्म अवेअरनेस’चे कार्यक्रम होतील. ५५ देशांमध्ये आपल्या शाखा व्हायला हव्या आणि शाखांची संख्या दोन हजारांपर्यंत वाढावी, असा येत्या दोन वर्षांमधला प्रयत्न आहे. मात्र, सध्याच्या चित्रावरून ५५ देशांपलीकडे शाखा होण्याची शक्यता आहे. पंचसूत्रांचा विचार केल्यास, प्रत्येक देशाच्या परिस्थितीनुसार त्याचा विचार केला जातो. भारतात जे होतं, ते परदेशात व्हायलाच पाहिजे, असा विचार नाही. प्रत्येक देशातील टीम मात्र यासंदर्भात विचार करत असते. पंचसूत्रांमधील कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण हे दोन विषय सर्वांसाठी समान आहेत. भारताबाहेर हिंदू स्वयंसेवक संघाने ‘योग’ हा विषय उचलून धरला आहे. योग केंद्र, शाळा, महाविद्यालय, स्टुडिओ अशांना जोडून घेण्याचे, त्यांच्यात समान सूत्रं निर्माण करण्याचे काम स्वयंसेवक करच असतात. योगाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन आणि सर्वांपर्यंत योग पोहोचणे, असे मुद्दे घेऊन संघाचे काम सध्या सुरू आहे.
’कोरोना’ काळात जगभरातील संघ स्वयंसेवक आपल्या जीवाची पर्वा न करता, ठिकठिकाणी सेवाकार्य अविरतपणे राबवित होते. त्यावेळी परदेशात सेवाकार्य राबविताना नेमकी कोणती आव्हाने होती? त्यावर तेथील स्वयंसेवकांनी कशी मात केली?
खरं तर कोरोना महामारी हा सुरुवातीला सगळ्यांसाठीच एक धक्का होता. नेमकं काय करायचं, याबाबत कुणालाच काही कळत नव्हतं. त्यानंतर हळूहळू नेमकी आवश्यकता काय, हे लक्षात आलं. अनेक देशांमध्ये मास्कची उपलब्धता नव्हती. अशावेळी ‘कोविड’ योद्धांसाठी महिला कार्यकर्त्यांनी घरी राहूनच मास्क शिवणे आणि त्याचे नंतर वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. ‘कोरोना’मुळे बर्याच ठिकाणी निराशा आणि भीतीचं वातावरण होतं. इंग्लंडमध्ये प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ’विश्व शांती यज्ञ’ केला. त्यावेळी यज्ञाचे सर्व विधी ऑनलाईन स्वरुपात सांगण्यात आले. भोजन वितरणाचाही कार्यक्रम ‘कोरोना’ काळात झाला. लसीकरणाची वेळ आली, तेव्हा ’सेंट्रल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी’ नावाच्या सरकारी एजन्सीने व्हेन्टिलेटर्स हवे असल्याचे आवाहन केले होते. तेव्हा हिंदू स्वयंसेवक संघ, ‘सेवा इंटरनॅशनल’ने त्यांना व्हेन्टिलेटर्स पुरवले. अनेकांनी सुट्ट्या घेऊन, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अभ्यासातून वेळ काढून, परदेशातील समाजासाठी वेळ दिला. त्यानंतर त्या-त्या देशातील पंतप्रधानांनी-राष्ट्राध्यक्षांनी ’कोविड’ योद्धांचे, ‘सेवा इंटरनॅशनल’चे कौतुक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ’सेवा इंटरनॅशनल’ला कौतुक करणारे, एक पत्रही पाठवले आहे.
मागील काही वर्षांत अमेरिका, कॅनडासह परदेशातील काही देशांमध्ये हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. तेव्हा अमेरिका आणि पाश्चात्य जगतात ‘हिंदूफोबिया’ वाढल्याचे हे द्योतक म्हणथा येईल का?
परदेशात हिंदूंची-भारतीयांची संख्या वाढत चालली असून, त्यांचे यशही सार्या जगासमोर येऊ लागले आहे. मात्र, हे न आवडणारे लोकंही जगात आहेतच. त्यांनी अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले आहे. विशेषतः काही विद्यापीठांमध्ये, काही माध्यमांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदू समाजामध्येही त्यानिमित्ताने जनजागृती होत आहे. अनेक लोकं पुढे येऊन याविषयी विचार करत आहेत. अमेरिकेत ’अंडरस्टॅण्डिंग हिंदूफोबिया’ नावाची दोन वेळा परिषदही झाली. ’हिंदूफोबिया’ शब्द हल्ली-हल्ली आपण वापरायला सुरुवात केला आहे. परंतु, तो प्रस्थापित नाही. ‘हिंदूफोबिया’ आहे, हे मुळात कोणाला मान्यच नाही! त्यामुळे सर्वप्रथम ‘हिंदूफोबिया’ तेथील समाजात आहे आणि तो वेगवेगळ्या स्वरुपात आहे. परंतु, तो असता कामा नये, तो मान्य होता कामा नये, यासाठी विविध परिषदा होत असतात. अमेरिका, कॅनडा, युकेमध्ये काही ‘अॅडव्होकसी ग्रुप्स’ही तयार केले आहेत. त्यांनी हा विषय लोकप्रतिनिधींमध्ये, माध्यमांमध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. हळूहळू त्याला यशही येत जाईल. हिंदू समाजात यासंदर्भात जागृती होऊन, त्यांनीही या विरोधात उभं राहावं, यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न सुरु आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला नक्कीच काही वर्षं लागतील; मात्र यश नक्कीच येईल.
एकीकडे हिंदूंवरील हल्ल्याचे सावट असताना, दुसरीकडे जॉर्जिया, फ्लोरिडा या अमेरिकेतील काही राज्यांनी ’हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करुन एक वेगळा पायंडा पाडला. तसेच ‘व्हाईट हाऊस’मध्येही दिवाळी आवर्जून साजरी केली जाते. तेव्हा अलीकडच्या काळात हिंदू समाजाविषयी, हिंदू सण-उत्सवांविषयी पाश्चात्त्यांच्या मनातही आदरभावना, जागरूकता निर्माण झालेली दिसते. तुमचे याबाबतचे निरीक्षण काय?
हे लक्षात घ्यायला हवे की, ज्या ज्या देशांमध्ये हिंदूंची संख्या वाढली, तिथे तिथे दिवाळी तसेच होळी साजरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. केवळ हिंदू बांधवच नाहीत, तर परदेशातील स्थानिक रहिवाशांचाही सहभाग या सणसमारंभांमध्ये वाढलेला दिसतो. त्यामुळे ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी करणे असो किंवा इथल्या महापौरांनी हिंदू सणांविषयी आपल्या समाजमाध्यमांवर पोस्ट करणे, या सगळ्याचा एक चांगला परिणाम निश्चितच झाला आहे. परदेशातील हिंदू स्वतःही सण साजरे करतात आणि इतरांनाही ते साजरे करण्यासाठी आमंत्रित करतात. ’सेवा दिवाळी’च्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथेही या उपक्रमाला चांगली दिशा देण्याचे काम सुरू आहे. ’कोरोना’नंतर दोन वेळचं जेवणही पूर्ण मिळत नाही, अशांची संख्या वाढली. तेव्हा दिवाळी सणाला ‘सेवा’चा विषय जोडण्याची संकल्पना आखली. हिंदूंनी याला चांगला प्रतिसाद दिला. हिंदू लोकं जेव्हा फटाके फोडतात, तेव्हा अमेरिकन लोकं स्वतःहून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. होळी, नवरात्रीला होणार्या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदूच नाही, तर स्थानिक रहिवाशीही स्वतःहून आनंदाने सहभागी होतात. ’हिंदू हेरिटेज मंथ’साठी विशेष प्रयत्न करून, त्या-त्या राज्याने याची घोषणा करावी, असे प्रयत्न अनेक संस्थांनी केले आहेत. त्यानिमित्ताने महिनाभराच्या कार्यक्रमात हिंदू धर्म काय आहे? हिंदू समाज काय आहे? त्यांचे त्या देशांत नेमके योगदान काय? हे लोकांना कळावं, याकरिता विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
२०१४च्या भारतातील सत्तांतरानंतर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये ’गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही भावना जागृत झालेली दिसते. आपले सण-उत्सव, परंपरा आता परदेशातील हिंदू बांधव अगदी रस्त्यावर उतरून साजरे करतात. तेव्हा या परदेशातील बदलेल्या हिंदू मानसिकतेकडे आपण कसे बघता?
भारताप्रमाणेच परदेशातही हिंदू मानसिकता नक्कीच बदलली आहे. त्यांचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे. त्यासोबतच गौरवाची भावनाही वाढली आहे. या वातावरणाचा उपयोग करून, प्रत्यक्ष जीवनात हिंदू संस्कार कसा येईल, प्रत्येक परिवारात त्याचे पालन कसे होईल, एकाअर्थी आपल्या शाश्वत जीवनमूल्यांचे प्रकटीकरण कसे करता येईल, ज्या देशांत आपण राहतो, त्या ठिकाणी आपल्या जीवनमूल्यांच्या आधारावर आपण काय करू शकतो, याबाबत विचार करायला हवा. लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून, तरुणांमध्ये निरनिराळ्या इंटर्नशीप-स्पर्धा किंवा त्यांनी भारतात येऊन दोन महिने राहून प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेणे, यासाठी परिवार म्हणून आपण काय करू शकतो? अशा प्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न आपण जगभर करतो आहे. अशा दृष्टिकोनासाठी आपले प्रयत्न सध्या सुरू आहेत.