कलातपस्वी

22 Mar 2024 21:27:24
Article on Vijay Acharekar



चित्रकलाक्षेत्रात इतके यश आणि उंची गाठूनही प्रसिद्धीच्या झोतापासून ते दूरच राहिले. सध्या ते गरजू कलाप्रेमींना चित्रकलेचे मोफत धडे देत आहेत. जाणून घेऊया विजय आचरेकर यांच्याविषयी...

मुंबईतील घाटकोपरमधील विजय दशरथ आचरेकर यांचा १९६७ सालचा जन्म. वडील बँकेत लिपिक, तर आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण चोगले हायस्कूलमधून पूर्ण केले. शालेय वयातच चित्रकलेची आवड निर्माण झाली. दीपोत्सवामध्ये ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रांगोळी काढत असत. ही रांगोळी पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोकं गर्दी करत असत. भविष्यात चित्रकलेतच करिअर करण्याचे ठरवले होते. म्हणून, पुढील प्रवेश घेण्यासाठी ‘फर्स्टक्लास’ आवश्यक असल्याने त्यांनी दहावीला जोमाने अभ्यास केला. १९८४ साली दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला.

चार भावंडांचा खर्च वडील सांभाळत होते. त्यामुळे विजय यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये पार्टटाईम काम करण्यास सुरुवात केली. रंग, ब्रश अशा गोष्टींना पैसे लागत होते, त्यामुळे स्वतःचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी ही नोकरी केली. पुढे ते पूर्णवेळ नोकरी करू लागले. जॉन फर्नांडिस, वासुदेव कामत या दोन्ही चित्रकारांच्या स्टुडिओमध्ये विजय कामानिमित्त भेट देत असत. विशेष म्हणजे, हे दोघेही बोरिवलीचेच. त्यावेळी इल्युस्ट्रेशनऐवजी फाईन आर्ट्सकडे लक्ष देण्याचा सल्ला फर्नांडिस यांनी दिला. पुढे रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये विजय सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

बडोदा येथील स्वामीनारायण मंदिर परिसरात चित्र काढण्याच्या कामाविषयी फर्नांडिस यांना विचारणा झाली. परंतु, त्यांना ते शक्य नसल्याने त्या कामासाठी त्यांनी विजय यांचे नाव सुचवले. दीड ते दोन महिने विजय यांनी बडोद्यात राहून हे काम पूर्ण केले. स्वामीनारायण यांच्या आयुष्यातील घटनांचे चित्र रेखाटण्याचे हे काम होते. यामुळे विजय यांना बराच अनुभव गाठीशी आला आणि त्यांनी इल्युस्ट्रेशनऐवजी फाईन आर्ट्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केला. पत्नीलाही कलेची आवड होती. वाय. बी. चव्हाण आर्ट गॅलरीत त्यांचे पहिले चित्रप्रदर्शन भरवले. यावेळी एकही चित्र विकले गेले नाही. मात्र, त्यांनी हार न मानता आपली चित्रकला आणखी कशी बहरेल याकडे लक्ष दिले. पुढे विजय यांना अनेक कामे मिळत गेली. ‘चिन्मय मिशन’च्या प्रकल्पावरही त्यांनी चार ते पाच वर्ष काम केले. एकनाथी भागवत, चित्रकूट येथे रामायणातील प्रसंग या प्रकल्पांवरही त्यांनी काम केले. ४५व्या वर्षी त्यांनी वासुदेव कामत यांच्यासोबत युरोप यात्रा केली. तेव्हा त्यांना खरी चित्रकला पाहता आली. यावेळी भारतीय कला अभ्यासक्रमातील अनेक उणिवा त्यांना समजल्या.

यानंतर चित्रप्रदर्शन आणि प्रोजेक्ट वर्क सुरूच होते. सध्या ते ‘ओंकारेश्वर’ प्रकल्पावर काम करत आहे. परदेशवारीला गेल्यावर तेथील वस्तुसंग्रहालय बघण्यावर त्यांचा भर असतो. मागील तीन ते चार वर्षांपासून ते कलेची आवड असणार्‍या मुलांना ऑनलाईन पद्धतीने चित्रकलेसंदर्भात मार्गदर्शन करत असतात. यासाठी ते कोणतेही शुल्क आकारत नाहीत. विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करत असतात. विजय यांचे आतापर्यंत ३५ हून अधिक सामूहिक चित्रप्रदर्शन, तर १५ हून अधिक वैयक्तिक चित्रप्रदर्शन यशस्वीरित्या भरविण्यात आले आहे. नुकताच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते भरतमुनी सन्मान प्रदान करण्यात आला. विजय आचरेकर आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष असून, कलेची आवड असणार्‍या मुलांसाठी ते मागील तीन वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. विजय यांचे मुंबईत सध्या दोन स्टुडिओदेखील आहेत. मागील महिन्यातच ते रशियाला जाऊन आले. त्यावेळी तेथील कलेचा अभ्यासक्रम पाहून विजय अवाक झाले. तिथे रशियन मुलांना मोफत देतात. हा अभ्यासक्रम भारतात असणे आवश्यक असल्याची भावना विजय व्यक्त करतात.

कलेसाठी अनेक वर्षांची साधना लागते. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे काम समोर आले, तर त्यासाठी पूर्वतयारी व अभ्यास हा करावाच लागतो. आजचे तरुण एका वाटेवर लक्ष्य केंद्रित न करता अनेक वाटा धुंडाळतात. त्यामुळे ते त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आईला चित्रकलेची आवड होती, मात्र ती जपणे तिला शक्य झाले नाही. आईच्या माहेरच्या लोकांनाही कलेची आवड होती. आईला कलेची आवड जोपासता आली नाही. मात्र, तिची इच्छा मी पूर्ण केली. आपल्या मनावर ताबा असेल, तर आपल्याला उंची गाठता येईल. तेव्हा मनःशांतीसाठी मी विपश्यनादेखील केली. मला बरीच अध्यात्माशी संबंधित कामे मिळाली. चित्रकलेसाठी मला घरातूनही पूर्ण सहकार्य मिळाले, असे विजय सांगतात.

चित्रकलाक्षेत्रात इतके यश आणि उंची गाठूनही प्रसिद्धीच्या झोतापासून ते दूरच राहिले. ज्यांना चित्रकलेची आवड आहे. परंतु, परिस्थितीमुळे ती जोपासणे शक्य होत नाही, अशा कलाप्रेमींना ते चित्रकलेचे मोफत धडे देत आहेत. कलाक्षेत्रात आपली विजयी पताका डौलाने फडकावणार्‍या चित्रकार विजय आचरेकर यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अगदी मनःपूर्वक शुभेच्छा...

७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0