मराठी आणि हिंदीतला मोठा फरक म्हणजे ‘बॉंडिग’ – श्रेयस तळपदे

02 Mar 2024 15:33:22
मराठी मनोरंजनसृष्टीत काम करत असताना घरी काम करत असल्यासारखे वाटते. प्रत्येक कलाकारासोबत एक वेगळाच ब़ॉंड असतो, असेही श्रेयस म्हणाला.
 

shreyas talpade 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मायबोली मराठी असली तरी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्याने अढळ स्थान निर्माण केले आहे असा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) त्याच्या नव्या ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi Gath) या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीत झळकला आहे. मराठी आणि हिंदीत (Bollywood) एकाचवेळी काम करत असताना नेमका कोणता फरक जाणवतो असे त्याला विचारले असता, श्रेयस म्हणाला, “बॉंडिगचा मला फरक जाणवतो. म्हणजे मराठीत काम करत असताना खरंच घरी काम करतोय असं वाटतं आणि हिंदीत काम करत असताना किमान त्या कलाकारांसोबत आणि त्या वातावरणाशी जुळवून घेण्यात आणि आजच्या भाषेत बॉंडिग होण्यासाठी वेळ जातो”, असे ‘महाएमटीबी’शी बोलताना श्रेयस म्हणाला.
 
आपण हे वाचलंत का? - सई ताम्हणकर करतेय बॉलिवूडच्या धमाकेदार प्रोजेक्ट्सवर सही!  
 
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा फरक कोणता याबद्दल अधिक बोलताना श्रेयस म्हणाला, “मराठीत बजेट हा एकच मोठा विषय आहे. कारण हिंदीचा प्रेक्षकांचा आवाका हा देश आणि जगभरात आहे आणि मराठीचा महाराष्ट्रापुरता मर्यादीत आहे. मुळात मी स्वत: एकांकिका, नाटक, मालिका करुन चित्रपटांमध्ये कामं केली. त्यामुळे माझ्यासोबत जे कलाकार काम करत होते ती संपुर्ण आमची पिढी एकत्रच यशाच्या जवळ गेली आणि मोठी झाली. कारण या कलाकारांसोबत तुम्ही बरीच वर्ष काम केलं असतं, त्यामुळे सवयी किंवा त्यांच्या अभिनयाचा बाज तुम्हाला माहित असतो. आणि त्याचमुळे कामं करताना एक वेगळीच मजा आणि उर्जा असते. मग ते संजय जाधव, अंकुश चौधरी, शरद पोंक्षे या सगळ्यांसोबत विविध माध्यमांतून कामं केल्यामुले शिकायला देखील फार मिळाले. त्यामुळे हिच बॉंडिग मराठीत काम करताना फार आल्हाददायक असते”, असे श्रेयस म्हणाला.
 
आपण हे वाचलंत का?  - ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला थेट न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’वर  
 
तर हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “हिंदीतील कलाकारांसोबत तुम्ही एक नट म्हणून फार पुर्वीपासून काम न केल्यामुळे अडसर येतो. पण कालांतराने त्याही गोष्टी सोप्या होतातच, मात्र, मराठीत काम करणं हे घरी काम करण्यासारखं असतं”, असं प्रामाणिक मत देखील श्रेयसने व्यक्त केले.
 
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात श्रेयस तळपदे एक वेगळी भूमिका साकारत असून त्याच्या सोबत अभिनेत्री गौऱी इंगवळे देखील आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0