दोस्त दोस्त ना रहा...

    19-Mar-2024   
Total Views |
Pakistan-Taliban attacks

"तालिबानने पारतंत्र्याच्या बेड्या उखडून टाकल्या आहेत,” हे शब्द होते, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघार घेत असताना अफगाणी महिलांसाठी, अल्पसंख्यांकांसाठी सगळं जग चिंतेत असताना, पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी इस्लामिक संघटना असलेल्या तालिबानच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला गेला. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ’आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद काबूलमध्ये तालिबानी पदाधिकार्‍यांसोबत चहा पित होते. यावरून पाकिस्तान जगाला हेच दाखवत होता की, तालिबानचा विजय हा आमचाच विजय आहे. तालिबानच्या रुपाने अफगाणिस्तानवर आमचंच नियंत्रण असेल. पण, तालिबाननी सत्ता मिळवून, अडीच वर्षं झाल्यानंतर, आता तालिबान पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पाकिस्तानी सैन्याने ’तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी, अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून एअर स्ट्राईक केला. याआधी सुद्धा पाकिस्तानने अशा प्रकारचे नियंत्रित हल्ले केले होते. मात्र, यावेळी अफगाणिस्तानने पाक सैन्याला चोख उत्तर दिलं. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर हल्ल्याची माहिती दिली. सोबतच अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी, तालिबान सज्ज आहे, असे विधान करून, पाकिस्तानला एक प्रकारे धमकीच दिली.पाकिस्तानविरोधात थेट कारवाई करण्याची तालिबानची ही पहिलीच वेळ असली, तरी तालिबानने याआधी सुद्धा पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करण्याची धमकी दिली होती. पाकिस्तान आणि तालिबानमधील वादांची तीन मुख्य कारणं. यातील पहिले कारण की, अफगाणिस्तानच्या जमिनीवरून पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवाया. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तानमध्ये पाच हजार ते सहा हजार ’टीडीपी’चे दहशतवादी आणि त्यांचे कुटुंब शरण घेत आहेत. अफगाणिस्तानमध्येच राहून ते पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करतात.

तालिबानने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी पाकिस्तानची मागणी. पण, तालिबानने अशा प्रकारची कोणतीही कारवाई ’टीडीपी’वर करण्यास नकार दिला. ‘पाकिस्तान तालिबान’ आणि ‘अफगाणिस्तान तालिबान’ या वेगवेगळ्या संघटना असल्या तरी दोघांचे विचार आणि ध्येय एकच. अफगाणिस्तान तालिबानला आपल्या देशात ’शरिया’ कायदा लागू करायचा आहे, तर ‘टीडीपी’ला पाकिस्तानमध्ये. दोघांचे विचार एक, ध्येय एक यामुळे दोन्ही संघटनांमध्ये सख्य. अमेरिकेविरोधातील युद्धात ’टीडीपी’ने तालिबानला मदत केली होती. त्यामुळे पाकिस्तानने कितीही दबाव टाकला, तरी तालिबान ’टीडीपी’वर कारवाई करणार नाही. अफगाणिस्तान तालिबानचे समर्थन करणे आणि ’टीडीपी’ला विरोध करणे हेदेखील पाकिस्तानचे दुटप्पी धोरणच. अफगाणिस्तानमध्ये ’शरिया’ लागू होणार, तथाकथित इस्लामी राजवट प्रस्थापित होणार, या विचारानेच हुरळून जाणार्‍या, पाकिस्तान्यांना आपल्या देशात मात्र ’टीडीपी’ नकोय. त्यांचा ‘शरिया’ कायदा नकोय. पण, आज ना उद्या त्यांच्या पाकिस्तानच्या भविष्यात तेचं लिहिलं आहे.

’टीडीपी’नंतर पाकिस्तान आणि तालिबानमधील वादाचा दुसरा मुद्दा आहे, २ हजार, ६४० किमी लांबीची सीमा ‘ड्यूरंड लाईन.’ पाकिस्तान ‘ड्यूरंड लाईन’ला आंतरराष्ट्रीय सीमा मानतो. मात्र, तालिबान या सीमारेषेला मान्यता देत नाही. पाकिस्तानने २०१७ मध्ये बेकायदेशीर घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी या सीमेवर कुंपण घालण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, तालिबान या सीमारेषेला मान्यता देत नसल्यामुळे, तालिबानने हे कुंपण नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील या संघर्षाची झळ निष्पाप अफगाणी निर्वासितांना बसत आहे. पाकिस्तानने अफगाणी निर्वासितांना बाहेर काढण्याचा निर्णय हा निराशतेतून घेतला होता. त्यामुळे तालिबान आपल्या नियंत्रणात राहील, अशी भाबडी समज पाकिस्तानची होती. ती आता फोल ठरली आहे. धर्माच्या नावाखाली स्वार्थासाठी झालेली ही मैत्री आता तुटली आहे. या परिस्थितीवर पाकिस्तानींना सध्या एकच गाणं आठवत असेल की, ’दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा!’


 

श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.