मुंबई : वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत एक सूचक कॅप्शनही त्यांनी लिहीले आहे. त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ज्या पक्षात १८ वर्षे काम केलं त्या मनसे पक्षाचा नुकताच वसंत मोरेंनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते कोणत्या पक्षात जाणार अशा चर्चा सुरु असताना त्यांचा एक फोटो पुढे आला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर समुद्राकडे तोंड करुन उभे असलेला एक फोटो पोस्ट केला असून या फोटोला 'एक नवी दिशा जी माझ्या पुण्याच्या हिताची असेल' असं कॅप्शन दिलं आहे.
हे वाचलंत का? - 'इंडी' आघाडीत सगळेच इंजिन, बोगी नाहीच!
दुसरीकडे, वसंत मोरेंना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ईच्छा आहे. राजीनाम्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे या तीन पक्षांकडून प्रवेशासाठी ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय वसंत मोरेंनी शरद पवार आणि संजय राऊतांची भेटही घेतली आहे. त्यानंतर आता त्यांनी हा फोटो शेअर केल्याने ते खरंच एखाद्या पक्षात प्रवेश करतील का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तसेच लोकसभेसाठी त्यांना नेमकी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.