मुंबई : अजितदादांच्या पक्षातले अनेक आमदार आमच्याकडे परत येण्यास तयार आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. लोकसभेतच ते आमच्याकडे येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवार म्हणाले की, "अजितदादांच्या पक्षातले अनेक आमदार आमच्याकडे परत येण्यास तयार आहेत. विधानसभेत आपल्याला भाव मिळणार नाही असं त्यांचं मत असल्याने बरेच आमदार आमच्याकडे येणार आहेत. मी कधीही हवेत बोलत नाही. ज्या चर्चा सुरु असतात त्या ऐकूनच मी बोलत असतो. तिथले १२-१३ आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यास इच्छूक असून मराठवाड्यातील एक नेते त्यांचं प्रतिनिधीत्व करणार आहे. तसेच कोकणातल्याही एका नेत्याचा त्यांना पाठींबा आहे," असा दावा त्यांनी केला.
हे वाचलंत का? - समुद्राकडे तोंड करत वसंत तात्या म्हणतात, "माझ्या पुण्याच्या..."
ते पुढे म्हणाले की, "एकीकडे दादांसोबत आहे असं दाखवून दुसरीकडे भाजपबरोबर चर्चा करायची असा ट्रेंड तिथे सुरु आहे. त्याचबरोबर २२-२३ आमदारांना वाटतं की, आपल्या नेत्याला आणि आपल्या पक्षाला भाजप न्याय देणार नाही. त्यामुळे असं होणार असेल तर बरेच लोकं नाराज आहेत आणि ते लोकसभेमध्येच परत आपल्या घरी यायला सुरुवात होईल असं आम्हाला वाटतं," असेही ते म्हणाले.