(Sarkaryavah Dattatray Hosbale)
नागपूर : "सामाजिक समरसता हा संघाच्या रणनीतीचा भाग नाही, तर तो निष्ठेचा विषय आहे. समाजातील उदात्त शक्तींच्या एकत्रीकरणातून आणि सामूहिक प्रयत्नातून सामाजिक परिवर्तन घडेल. यासाठी संपूर्ण समाजाला जोडून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाण्याचा संघाचा संकल्प आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.
नागपूर येथे संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी २०२४-२०२७ या वर्षांसाठी दत्तात्रेय होसबळे यांची एकमताने सरकार्यवाह म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला सरकार्यवाह आणि अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संबोधित केले.
हे वाचलंत का? : सौहार्दपूर्ण समाजाची निर्मिती हीच श्रीरामाची खरी पूजा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकार्यवाह म्हणाले, "निवडणुका हा देशातील लोकशाहीचे महापर्व आहे. देशात लोकशाही आणि एकात्मता बळकट करून प्रगतीचा वेग कायम राखणे आवश्यक आहे. १०० टक्के मतदानासाठी संघ स्वयंसेवक समाजात जनजागृती करणार आहेत. याविषयी समाजात कोणतेही वैमनस्य, विभक्तता, मतभेद किंवा एकात्मतेच्या विरुद्ध काहीही असू नये, याचे भान समाजाने ठेवायला हवे."
गेल्या काही वर्षात वाढलेले संघकार्य आणि येऊ घातलेल्या संघ शताब्दी वर्षासंदर्भातही सरकार्यवाहंनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, "संघाचे कार्य हे देशव्यापी राष्ट्रीय अभियान आहे. आपण सर्व एका समाजाचे, एका राष्ट्राचे लोक आहोत. येत्या २०२५ च्या विजयादशमीपर्यंत दैनिक शाखा आणि साप्ताहिक बैठकीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. संघाच्या कार्याचा प्रभाव आज समाजात दिसून येत आहे. संघाप्रती समाजाच्या या आत्मीयतेमुळे त्याबद्दल धन्यता आणि कृतज्ञतेची भावना आहे. संपूर्ण समाज संघटित झाला पाहिजे, हे संघाचे स्वप्न आहे. पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक समरसता हे कोणा एका संस्थेचे अभियान नाही, तर संपूर्ण समाजाचे अभियान आहे."