२०० आदिवासींनी केली घरवापसी; म्हणाले, "आम्हाला आमिष दाखवून..."

18 Mar 2024 11:30:07
 GharWapasi
 
रायपूर : छत्तीसगडमधील रायगड जिल्हात मोठ्या प्रमाणावर घरवापसी झाली आहे. या वेळी 'कोरबा आदिवासी समाजा'तील ५६ कुटुंबातील २०० लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. त्यांनी धार्मिक विधी पार पाडून सनातन धर्मात घरवापसी केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अखिल भारतीय घर वापसी अभियानाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी वैयक्तिकरित्या सर्वांचे पाय धुतले आणि सर्वांना हिंदू धर्मात घरवापसी करुन घेतली.
 
घरवापसीचा हा संपूर्ण कार्यक्रम दि. १७ मार्च २०२४ रोजी छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील बरघाट या आश्रित गावामध्ये झाला. या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील नागरिकही उपस्थित होते. याशिवाय प्रबल प्रताप सिंग जुदेव यांच्यासह अनेक हिंदू कार्यकर्त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी ५६ कुटुंबातील सुमारे २०० लोकांचे पाय धुतले आणि मंत्रोच्चार करून हवन करून त्यांची घरवापसी घडवून आणली.
 
हे वाचलंत का? -  मविआत प्रकाश आंबेडकर 'वंचित' राहणार! नवी खेळी
 
घरवापसी कार्यक्रमाला संबोधित करताना प्रबल प्रताप सिंह जुदेव म्हणाले, “आता धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही, जो कोणी या कृत्यात सहभागी असेल त्याने शिक्षा भोगण्यास तयार राहावे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल." धर्मांतराला देशासाठी धोका असल्याचे सांगून ते म्हणाले, "याची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाही." ते म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यानंतर धर्मांतर केलेल्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे."
 
याआधी प्रबल सिंह जुदेव यांनी डिसेंबर 2023 मध्ये किलकिला धाममध्ये 8 कुटुंबांची घरवापसी घडवून आणली होती. यापूर्वी त्यांनी १०१ कुटुंबांना घरी परतण्यास मदत केली होती. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या आमिषांना बळी पडून आम्ही हिंदू धर्म सोडला होता, असे यावेळी घरवापसी करणाऱ्या आदिवासींनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0