मुंबई : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवार, दि. १६ मार्च रोजी मुंबईत दाखल झाली. रविवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा होणार आहे.
शनिवारी मुलुंड येथून सायनमार्गे धारावीत यात्रा दाखल झाली. येथील शक्ती विनायक मंदिराजवळ गांधी यांनी धारावीकरांना संबोधित केले. "धारावी भारताचे उत्पादन हब बनवले पाहिजे; कारण धारावीच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे कौतुक केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही संभ्रमात पडले.
चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून राहुल यांच्या यात्रेचा समारोप झाला. दरम्यान, रविवारी सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित राहतील.
वीर सावरकरांवर बोलाल, तर याद राखा!
आतापर्यंत अनेक वाघांच्या डरकाळ्या या मैदानाने ऐकल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या दिग्गजांनी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतल्या. मात्र, १७ तारखेला होणाऱ्या सभेमध्ये काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुई कुई ऐकण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्राला लाभणार आहे. हे मैदान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. शिवाजी पार्कजवळच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर आहे. तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुमचे म्हणणे मांडा. पण इथे येऊन सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास, महाराष्ट्रातील १४ कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.