ठाण्यात पहिले निवासी इस्कॉन मंदिर

मान्यवरांच्या उपस्थितीत श्री श्री राधा गोविंददेव मंदिराचे लोकार्पण

    17-Mar-2024
Total Views |

iskon temple 
 
ठाणे : पिरामल रियल्टी आणि इस्कॉन ( Iskon Temple Thane ) यांच्या संयुक्त विद्यमाने पिरामल वैकुंठ, ठाणे येथे श्री श्री राधा गोविंददेव मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. १७ मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी पिरामल एंटरप्राइजेस लि.चे चेअरमन अजय पिरामल आणि इस्कॉनचे गौरंग दास प्रभू उपस्थित होते. एखाद्या सोसायटीमध्ये उभारण्यात आलेले इस्कॉनचे हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे.
 
एकूण ३२ एकर परिसरात हे मंदिर उभारले असून गुजरात आणि राजस्थानच्या भव्य मंदिरांपासून प्रेरणा घेऊन मंदिर बांधण्यात आले आहे. ९० फूट उंच कळस, १८ खांब यांसह मंदिराची निर्मिती 'शिल्पशास्त्र' आणि 'वास्तुशास्त्र' या तत्त्वांनी केली आहे. राजस्थानच्या भरतपूर येथील बन्सी पहारपुरा येथून मिळवलेल्या गुलाबी वाळूच्या दगडापासून अत्यंत बारकाईने मंदिराचे कोरीवकाम केले आहे. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराची आठवण करुन देणारे असे नागरा वास्तूशैलीचे स्वरूप आहे. मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुविधाही करण्यात आली आहे. तसेच मंदिराचे नक्षीकाम पाहिल्यास रामायण तसेच कृष्णलीलेच्या गोष्टी अभ्यासायला मिळतील.
 
"१९७०च्या दशकापासून पिरामल कुटुंब इस्कॉनशी निष्ठेने जोडले गेले आहे. माझी आई श्रीमती ललिता पिरामल यांच्यामुळे आध्यात्मिक संबंध अधिक घट्ट झाला. पिरामल रियल्टी आणि इस्कॉन यांचे एकत्र येणे हे अध्यात्म आणि आधुनिक जीवनमानाच्या सुसंवादी अभिसरणाचे प्रतीक आहे, 'सेवाभाव'च्या नीतिमत्तेचे उदाहरण देते, तसेच पिरामल समूहाची वचनबद्धताही प्रतिबिंबित करते. हे मंदिर केवळ पिरामल वैकुंठच्या रहिवाशांसाठीच नाही तर इतर सर्व भाविकांनाही दर्शनासाठी खुले आहे."
- अजय पिरामल, अध्यक्ष, पिरामल एंटरप्रायझेस लि.
 
 
iskon temple 2
 
हे मंदिर अनेकांसाठी एक उत्तम आश्रयस्थान आणि प्रेरणास्थान असेल. पिरामल कुटुंबीयांनी मानवतेसाठी दिलेल्या अद्भूत योगदानाबद्दल त्यांचे कौतुक. समाजाला जोडण्याचं काम हे मंदिर नक्कीच करेल. मला खात्री आहे की हे मंदिर ठाण्याचे वैभव मानले जाईल. ठाण्यातील प्रत्येकासाठी हे एक संस्कार केंद्र बनेल. 'ग्लोरी ऑफ ठाणे प्रोजेक्ट' म्हणून याची विशेष ओळख असेल.
- गौरंग दास प्रभू
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.